prasad jawade mother : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा हा रसिक प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा असतो. या सोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा झी मराठी पुरस्कार सोहळाही अगदी थाटामाटात पार पडला. यंदाच्या या सोहळ्याला लोकप्रिय कलाकारांच्या कुटुंबीयांनीही हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळालं. या कलाकारांचे कुटुंबाबरोबरचे अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. यांत प्राप्ती रेडकरची आजी, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची आई, ‘पारू’ फेम आदित्यची आई अशा कलाकारांचे कुटुंबीय या सोहळयाला उपस्थित होते. कुटुंबियांच्या या एंट्रीचे भावुक करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
यांत पारू फेम अभिनेता आदित्य म्हणजेच प्रसाद जवादेच्या एका भावुक व्हिडीओने साऱ्यांचे डोळे पाणावले. या ‘झी मराठी’ सोहळ्यात प्रसादला भेटायला त्याची आई आली होती. आईला पाहून प्रसाद भावुक झालेला दिसला. याचबरोबर मंचावर प्रसादची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुखही उपस्थित होती. यावेळी प्रसादच्या आईला गेल्यावर्षी कॅन्सरचे निदान झाल्याचं समोर आलं. मात्र, या कठीण प्रसादने न खचता आईची सेवा आणि मालिकेचं शूटिंग उत्तमरीत्या पार पाडलं.
प्रसाद जवादेची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख याबद्दल म्हणते, “मागच्या वर्षी दिवाळीमध्ये काकूंना कॅन्सरचं निदान झालं. खरंतर, प्रसादला रोज मालिकेत काम करताना पाहायचं हे काकूंचं स्वप्न होतं. त्यामुळे एकीकडे पारू मालिकेचं शूट सुरू होतं त्याचवेळी दुसरीकडे आम्ही – काकूंचे उपचार सुद्धा सुरू केले. प्रसादच्या स्वभावातील सगळे पैलू मी आजवर पाहिलेत. पण, या आजारपणात जेव्हा मी प्रसादला काकूंची एका वडिलांप्रमाणे काळजी घेताना पाहिलं.तेव्हा त्याची एक वेगळी बाजू मला दिसली”.
अभिनेत्याची आई पुढे म्हणाली, “रुग्णालयात सगळेजण त्याला श्रावणबाळ म्हणतात आणि खरोखरच तो आमच्यासाठी श्रावणबाळासारखा आहे. हा माझा आधुनिक काळातला श्रावणबाळ आहे. त्याला आज जे पारितोषिक मिळालंय ते तंतोतंत खरं आहे”. प्रसादला यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.





