Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ सध्या प्रेक्षकांना जबरदस्त मनोरंजन देत आहे. मालिकेच्या कथानकात येणारे नवे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. पारू, अहिल्यादेवी, आदित्य यांच्या नात्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ, भावनिक संघर्ष आणि कौटुंबिक वाद या सगळ्यांनी कथा आणखी रंगतदार बनली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या नव्या भागामुळे मालिकेत एक मोठं वळण आल्याचं पाहायला मिळणार आहे. आदित्य आणि पारूने एकमेकांशी लग्नगाठ बांधल्यानंतर आणि ते किर्लोस्कर कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर मालिकेतील ट्विस्ट वाढले आहेत. तर एकीकडे अहिल्यादेवींचाही पारा चढलेला पाहायला मिळत आहे.
मालिकेत आपण पाहिलं की, पारूने अहिल्यादेवीला प्रॉपर्टीच्या पेपरची नोटीस पाठवली आहे. या वेळी ती प्रियासह फोनवर बोलत असते आणि स्पष्ट शब्दांत म्हणते “आत्तापर्यंत देवीआईंना फक्त माझ्या नवऱ्याने साथ दिलीय. मला प्रॉपर्टी नको, पण माझा अधिकार हवाय”. तिचं हे म्हणणं ऐकून प्रियाला देखील धक्का बसतो. दरम्यान, पारूने पाठवलेल्या नोटीसची माहिती श्रीकांत आदित्यला देतो. हे ऐकल्यानंतर आदित्य आणि पारूमध्ये यावरुन वाद होतात.
मालिकेत आलेल्या या ट्विस्टला जोड देत आता ‘झी मराठी’ने नुकताच ‘पारू’ मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे, या प्रोमोमध्ये आदित्य अहिल्यादेवीकडे प्रॉपर्टीतील आपला हिस्सा मागताना दिसतो. भावुक होत तो अहिल्यादेवीला म्हणतो “जे माझं आहे ते मला मिळायलाच हवं.” त्यानंतर श्रीकांत संतापून प्रॉपर्टीच्या पेपर्सची फाईल टेबलवर फेकतो.
आणखी वाचा – ‘आम्ही दोघी’नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र, ‘असंभव’ चित्रपटामधून समोर येणार रहस्यमय कथा
प्रोमोमध्ये पुढे अहिल्यादेवी स्वतः ती फाईल उचलते आणि आदित्यच्या हातात देते. आणि म्हणते “हे घे प्रॉपर्टीचे पेपर… आणि इथून चालता हो” हे ऐकताच घरातले सगळेच शॉक होतात. आता पुढे मालिकेत नेमकं काय घडणार? अहिल्यादेवीचा हा निर्णय पाहून आदित्य आणि पारूचं नातं आणखी ताणलं जाणार का? की या वादातून काही नवं सत्य समोर येणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.





