‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमुळे लोकप्रियेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. कमी कालावधीत अंकिताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अंकिता इथवरच थांबली नाही. तर तिने तिचा प्रवास पुढे नेत आपली पावलं बॉलिवूडकडे वळविली. ‘मणिकर्णिका’ चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. कामाबरोबरच अंकिता तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. अंकिताला हिंदी सिनेसृष्टीत काम करत असताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. तिने २०२१ मध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिच्यासोबत कास्टिंग काऊचची घटना घडली होती, या घटनेने तिला खूप मोठा धक्का बसला होता. (Ankita Lokhande Casting Couch)
‘बॉलीवूड बबल’शी बोलताना या घटनेबाबत ती म्हणाली, “बऱ्याच वर्षांपूर्वी मला साऊथच्या चित्रपटासाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्या व्यक्तीने मला त्याच्या खोलीत बोलावले आणि विचारले अंकिता, मला तुला काही विचारायचे आहे. या चित्रपटासाठी तुला तडजोड करावी लागेल. त्यावेळी मी १९-२० वर्षांची होते, पण मी खूप हुशार होते. उलट प्रश्न करत मी त्याला विचारले, तुमच्या निर्मात्याला कोणत्या प्रकारची तडजोड हवी आहे, मी पार्टी किंवा डिनरला जावे असे त्याला वाटत आहे का?
तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, तुम्हाला निर्मात्याबरोबर एक रात्र एकत्र राहावं लागणार आहे, असं बोलताच मी त्याच्यावर भडकून अगदी स्पष्टपणे म्हणाले, ‘मला असं वाटतंय की तुमच्या निर्मात्याला काम करण्यासाठी मुलगी नको आहे, तर एक रात्र एकत्र घालवण्यासाठी हवी आहे’. असं म्हणून मी तिथून निघाले. यानंतर त्याने माझी माफी मागितली आणि मला चित्रपटात काम करण्यासाठी सांगितले. पण मी चित्रपटासाठी स्पष्ट नकार दिला”.
टीव्ही विश्वातून चित्रपटसृष्टीत आल्यावर अंकिताबरोबर अशीच एक घटना दुसऱ्यांदा घडली. याबाबत बोलताना अंकिता म्हणाली, “जेव्हा मी चित्रपटसृष्टीमध्ये परतले तेव्हाही मला पुन्हा यातून जावे लागले. मला त्या अभिनेत्याचे नाव घ्यायचे नाही, तो खूप मोठा अभिनेता आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण त्याने माझा हात धरताच मला घाम फुटला आणि मी त्याचा हात सोडला. त्यावेळी मला कळून चुकलं की, इथे मला राहता येणार नाही कारण येथे ‘गेव्ह अँड टेक’ रिलेशन होतं. तिथूनही मी बाहेर पडले”.