Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, मात्र ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत असून ऐश्वर्या-अभिषेक बच्चन वेगळे झाल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या दररोज कानावर येत आहेत, परंतु दोघांनीही अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या दरम्यान, अभिनेत्रीबरोबरची एक जुनी घटना व्हायरल होत आहे, जेव्हा ऐश्वर्या एका कार्यक्रमात तिच्या हाताला आणि डोळ्याला दुखापत घेऊन पुरस्कार घेण्यासाठी पोहोचली होती. तेव्हा अभिनेत्रीची अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
अभिनेत्रीबाबत घडलेली ही घटना २००० सालची आहे. त्यावेळी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटात सलमान खान देखील होता आणि ऐश्वर्या राय त्याला डेट करत होती. ऐश्वर्याच्या नावाची घोषणा होताच ती पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर पोहोचली. ऐश्वर्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण अवार्ड घेण्यासाठी पोहचलेल्या ऐश्वर्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती आणि हाताला दुखापत झाली होती. डोळ्याची दुखापत लपवण्यासाठी ऐश्वर्याने गॉगल घातला असला तरी दुखापत स्पष्ट दिसत होती.
पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्याने तिच्या आई-वडिलांचे आभार मानले आणि तिच्या अवस्थेचे कारणही सांगितले. ऐश्वर्या म्हणाली होती, “एक आठवड्यापूर्वी मी पडली होते. अपघात झाला. मी घसरले आणि माझ्या घराच्या बाहेरच्या पायऱ्यांवरुन खाली पडले, पण मी देवाचे आणि माझ्या पालकांचे आभार मानते की, माझ्याबरोबर कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, एकही हाड मोडले नाही”.
ऐश्वर्या पुढे म्हणाली, “लोक म्हणाले आज तू असा लूक का घेऊन जात आहेस? पण मला असे म्हणायचे आहे की मला माझ्या प्रेक्षकांचे आणि या चित्रपटसृष्टीचे आभार मानण्याची ही संधी मिळाली आहे. त्यांच्यामुळेच मी इथे मंचावर आले आहे”. ऐश्वर्याबरोबर घडलेली ही घटना सध्या पुन्हा चर्चेत आली असून अभिनेत्रीचा अवार्ड घेण्यासाठीचा लूकही व्हायरल होत आहे.