Shweta Mehendale Video : मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार असे आहेत जे नेहमीच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे स्पष्टपणे न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करतात. असे अनेक कलाकार आहेत जे समाजातील विविध विषयांवर सडेतोड भाष्य करत आपलं मत मांडतात. बरेचदा ही मंडळी नाट्यगृहांची दुरावस्था, ट्राफिक, प्रवासादरम्यान आलेले वाईट अनुभव अगदी सहज मांडतात. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रवासादरम्यान आला अनुभव शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पुणे नाशिक हायवेवर प्रवासादरम्यान अभिनेत्रीला हा वाईट अनुभव आला आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्वेता मेहंदळे. श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत तिला आलेल्या प्रवासाच्या अनुभवाबाबत भाष्य केलं आहे.
पुणे-नाशिक प्रवासादरम्यान श्वेताने तिला आलेल्या अनुभवाबाबत भाष्य केलं आहे. या प्रवासादरम्यान श्वेता यांची गाडी पोलिसांकडून थांबवण्यात आली. याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “दंड आहे की नाही हे बघायला आमची गाडी थांबवली. आम्हाला वेळ काळ आहे की नाही. उगीच आमची वेळ वाया घालवली. आता आम्ही पुणे-नाशिक हायवेवर आहोत. प्रवासादरम्यान पोलिसांनी आमची गाडी थांबवली. याच कारण विचारताच ते म्हणाले तुमच्या गाडीवर कोणता दंड आहे की नाही हे तपासायचं होतं”.
आणखी वाचा – छत्रपति शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसलेत ‘हे’ कलाकार, कलाकारांना भावला ‘या’ अभिनेत्याचा अभिनय
ती पुढे म्हणाली, “मला फक्त एक सांगा, आपण गाडी विकत घेतो, त्या गाडीचा ५०टक्के टॅक्स आपण भरतो. त्याच्याशिवाय आपण रोड टॅक्स भरतो. रस्ते चांगले बनवलेत आणि त्यावरुन प्रवास करता यावा म्हणून आपण टोल भरतो. वेळ वाचवण्यासाठी आपण हा टोल भरतो. पुढे आल्यावर हे पोलीस आपल्याला थांबवतात. आणि आपला वेळ खातात. आता मला सांगा उद्या आपल्या या वेळेवर आणि आपल्या जगण्यावर टॅक्स लागणार आहे का?”.
आणखी वाचा – “मला सांभाळायला कोणीच नाही”, बायकोबद्दल असं का बोलला होता अक्षय खन्ना?, म्हणालेला, “जबाबदारीही नाही आणि…”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “तुम्हाला सुखकर जगायचं असेल तर तुम्हाला हा टॅक्स भरावा लागेल. ही वेळ आपल्यावर येणार आहे का?, कोणतंही संभाव्य कारण नसताना आपल्याला असं का वागवलं जातं?, आपल्याला रस्त्यात असं का थांबवलं जातं?”, असं म्हटलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अभिनेत्री म्हणून अटेंशन घेत असल्याचं म्हटलं, तर काहींनी पोलिसांना सहकार्य करा असं म्हटलं. तर अनेकांनी हे चुकीचं आहे असं म्हणत अभिनेत्रीला पाठिंबा दर्शविला.