Vicky Kaushal Visited Raigad Fort : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरु आहेत. आणि आज १९ फेब्रुवारी असून आपल्या रयतेच्या राजाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तर रायगडावर याचा विशेष जल्लोष आहे. आणि या निमित्ताने नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला विकी कौशलही महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी रायगडावर पोहोचला आहे.
विकी कौशल रायगडावर पोहोचताच त्याने माध्यमांशी संवाद साधला. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधत असताना विकी कौशल म्हणाला की, “मला इथे येण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. खूप आधीपासून इथे येऊन दर्शन मिळावे असं स्वप्न होतं आणि आज इथे उपस्थित राहून मला महाराजांचा आशीर्वाद मिळतोय हे खूप भाग्याचं आहे. संपूर्ण टीमच्या मेहनतीने चित्रपटातील प्रत्येक सीन करणं शक्य झालं आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना सहन केल्या आहेत त्यापुढे ही मेहनत काहीच नाही आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात छत्रपती संभाजी महाराजांची महिमा पोहचावी हा एकच हेतू आहे”.
आणखी वाचा – छत्रपति शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसलेत ‘हे’ कलाकार, कलाकारांना भावला ‘या’ अभिनेत्याचा अभिनय
पुढे तो असंही म्हणाला की, “छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनपट जो जाणून घेईल, जो वाचेल तो आयुष्यात खूप काही शिकेल. मला तर लक्ष्मण उतेकर सरांनी महाराजांचा अभ्यास जवळून करण्याची संधी दिली, ही भूमिका साकारण्याची संधी दिली हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. मला बरंच काही शिकायला मिळालं आणि अर्थात यामुळे माझं आयुष्य बदललं”. अभिनेता विकी कौशलसह चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते.
पहिल्याच दिवशी ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवल्याचं पाहायला मिळालं. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी ‘छावा’ हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ३३.१ कोटींचा गल्ला जमावला होता. अवघ्या ५ दिवसांत सिनेमाने १७१.२८ कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.