बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या ‘डाकू महाराज’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात उर्वशीचा एक आयटम डान्सदेखील आहे, ज्याच्या स्टेप्समुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे. अशातच सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा अभिनेत्रीने तिच्या महागड्या घडयाळाबद्दल आणि अंगठीबद्दल सांगितले होते. ‘डाकू महाराज’चित्रपटाच्या यशानंतर तिच्या आईने तिला हे महागडं गिफ्ट दिल्याचं म्हटलं होतं. उर्वशीची ही प्रतिक्रिया व्हायरल झाली आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. (Urvashi Rautela reacts to trolling)
१५ जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर त्याच्या घरी हल्ला झाला होता. याबाबत उर्वशी रौतेलाला प्रश्न विचारला असता तिने आधी खंत व्यक्त केली. पण मध्येच तिने आपल्या मौल्यवान घड्याळांबद्दल सांगायला सुरुवात केली. यावरून तिची खूप खिल्ली उडवली गेली. ‘ब्यूटी विदाऊट ब्रेन’ अशा आशयाच्या अनेक कमेंट्स तिच्याबद्दल केल्या गेल्या होत्या. यानंतर उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली. मात्र, त्यानंतर ती पोस्ट हटवण्यात आली.
आणखी वाचा – “संन्यासानंतरही अभिनय करणार का?”, ममता कुलकर्णीने दिलं उत्तर, म्हणाली, “चित्रपटसृष्टीत परतणे माझ्यासाठी…”
अशातच या संपूर्ण प्ररणाबद्दल आता तिने मौन सोडलं आहे. उर्वशी रौतेलाने इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “आता काय आहे की, तुम्ही म्हणाल पुन्हा प्रश्नांची उत्तरे बरोबर देत नाहीये. पण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी, माझा सर्वात आवडता सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान… लोक त्यांनाही ट्रोल करायला सोडत नाहीत. तर आता तुम्हीच सांगा यात काय करायचं”.
दरम्यान, यानंतरही तिच्यावर काही नेटकरी टीका करत आहेत. “वाह… काय उत्तर दिलं आहे, म्हणजे काहीही…”, “तुलना केली ती पण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी”, “हिने पुन्हा तेच केलं” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिची फिरकी घेतली आहे.