टीव्ही विश्वाची लाडकी ‘छोटी बहू’ अर्थात अभिनेत्री रुबिना दिलैकने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आई झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती. रुबिना दिलैकने जुळ्या मुलींना जन्म दिला. सोशल मीडियावर सक्रिय असणारी रुबिना दिलैक आपल्या गर्भावस्थेदरम्यानच्या सगळ्या अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत होती. मात्र, मुलींच्या जन्मादरम्यान तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. यावरून तिने आपल्या बाळाला जन्म दिला असावा असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. अखेर त्यांचा हा अंदाज खरा ठरला आणि मुलींच्या जन्माच्या एक महिन्यानंतर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. त्यानंतर अनेकदा मुलींविषयीचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर केले होते. (rubina dilaik twins daughters birthday celebration)
अशातच आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या मुलींच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही गोड फोटो शेअर केले आहेत. रुबिना दिलैक आणि तिचा नवरा अभिनव शुक्ला यांनी त्यांच्या जुळ्या मुली जीवा आणि इधा यांचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन रुबिकाने आपल्या जन्मगावी शिमल्यात कुटुंबाबरोबर साजरा केलं. दोन्ही लेकींचे काही खास फोटो तिने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले असून ही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोसह तिने खास कॅप्शनही लिहिलं आहे, यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “पवित्र नोव्हेंबर … प्रेमाचे ३६५ दिवस, निखळ आनंद, वेडे संप्रेरक, गोंधळलेले आत्म, आनंदाचे क्षण आणि अनेक चढ-उतार… या सर्वांसाठी आम्ही खरच कृतज्ञ आहोत. आमच्या मुलींनी आमचे संपूर्ण जीवन विपुलतेने भरून टाकले आहे. त्यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा”.
दरम्यान, रुबिना व अभिनवने जून २०१८ मध्ये शिमला येथे लग्न केले. यानंतर, सप्टेंबर २०२३ मध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून गरोदरपणाची घोषणा केली. रुबिना ही हिंदी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती ‘बिग बॉस’ २०१४ ची विजेतीही होती. रुबिनाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये १६ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे.