‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमातील कलाकार, कार्यक्रमाचं कथानक या गोष्टी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. हास्यजत्रेने साऱ्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. पडद्यावर दिसणारे कलाकार हे कार्यक्रमाचे अविभाज्य घटक असले तरी या कार्यक्रमातील पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या लेखक, दिग्दर्शकांना विसरून चालायचं नाही. (Sachin Mote Incident)
टॉपचा कार्यक्रम असल्याने विशेष दडपण, सोबत रोज नेहमी वेगळं असं काय लिहायचं हा प्रश्न अर्थात लेखकाला पडणं साहजिकच आहे. असं असलं तरी यातून मार्ग काढत हास्यजत्रेचे लेखक, दिग्दर्शक सचिन मोटे नेहमीच मार्ग काढतात. नुकताच ‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमात सचिन मोटे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या घराचे अनेक किस्से सांगितले. दरम्यान त्यांच्या घरावर नावाची पाटी का नाही आहे, याचा देखील त्यांनी उलगडा केला.
पाहा का नाही आहे सचिन मोटे यांच्या घरावर नेमप्लेट (Sachin Mote Incident)
याबद्दल बोलताना सचिन मोटे म्हणाले की, “सुरुवातीला आम्हालाही वाटलं की, घर घेतल्यावर आम्ही नेमप्लेट वगैरे लावू. त्या दृष्टिकोनातून आम्ही दोन तीन नेमप्लेट आणल्या, पण त्या आणल्यावर ही नको, यापेक्षा काही वेगळी नेमप्लेट लावता येईल, या नादात नेमप्लेट लावायचंच राहून गेलं. खरं तर माणसाचं घर सापडावं म्हणून नेमप्लेट लावतात.”
“बरं आपण मालक थोडीच असतो, या बिल्डिंगची एक सोसायटी आहे, त्या अंतर्गत निर्णय घेतले जातात. खरंतर अभिमानाने आपलं नाव दारावर लावायची कधी गरज वाटली नाही. भविष्यात एखादी नेमप्लेट आवडली तर नक्की लागेल, पण दहा वर्षात तरी अजून नेमप्लेट आमच्या दारावर लागलेली नाही. का लावायची नेमप्लेट हा कधी कधी मलाच प्रश्न पडतो, आता तर माझं घर सर्वाना माहित झालंय वा सर्वांना सापडतही.”