The Family Man 3 : ‘द फॅमिली मॅन’ ही सर्वात लोकप्रिय ओटीटी वेबसिरिजपैकी एक आहे आणि लवकरच या सिरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते ‘द फॅमिली मॅन ३’ची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशातच आता प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी सिरिजमध्ये एका नव्या कलाकाराचा समावेश केला आहे. हा अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत, जो बॉलिवूडमधील व ओटीटी विश्वातील एक उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट व वेबसिरीजमध्ये काम केले आहे. ‘द फॅमिली मॅन’ने प्राइम व्हिडिओच्या सर्वोत्कृष्ट वेब सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामधील मनोज तिवारीसह सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. आणि आता जयदीप अहलावतही त्यांच्या दमदार अभिनयाने ही सिरिज आणखी रोमांचक करणार आहेत. (The Family Man 3 Updates)
या सिरिजमध्ये जयदीप अहलावतच्या आगमनानंतर, मनोज बाजपेयींच्या फॅमिली मॅन या सिरिजबद्दल लोकांची उत्कंठा वाढणार आहे, कारण जयदीप अहलावत एक उत्कृष्ट अभिनेता आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या बातमीनुसार, जयदीप अहलावतने ‘द फॅमिली मॅन ३’ मध्ये प्रवेश केला आहे. या सुपरहिट वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये मनोज बाजपेयीबरोबर जयदीप अहलावतही दिसणार आहे. काही वृत्तांमधून असे समोर आले आहे की, फॅमिली मॅन या सिरिजमधील कलाकारांमध्ये जयदीप सामील झाले आहेत आणि त्यांचे शूटिंगदेखील सुरु झाले आहे.
‘पाताळ लोक’मधील दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला जयदीप अहलावत ‘द फॅमिली मॅन 3’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ते नकारात्मक भूमिकेत दिसणार की मनोज बाजपेयीबरोबर मिशनमध्ये काम करणार हे स्पष्ट झालेले नाही. ‘आक्रोश’, ‘खट्टा मीठा’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रईस’, ‘राझी’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘बागी ३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेले जयदीप अहलावत ‘महाराज’ चित्रपटातही दिसले होते.
दरम्यान, ‘द फॅमिली मॅन’चा पहिला सीझन २०१९ मध्ये रिलीज झाला होता. दूसरा सीझन २०२१ मध्ये रिलीज झाला आणि हे दोन्ही सीझन सुपरहिट झाले आहेत. आता चाहत्यांना लवकरच प्रदर्शित होणाऱ्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वाजपेयीचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळाला, पण आता जयदीप अहलावतचा जबरदस्त अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक ‘द फॅमिली मॅन ३’ या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.