Rajesh Bhosale Struggle : कलाकार मंडळी म्हटलं की बरेचदा त्यांची स्ट्रगल स्टोरी ही आलीच. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं कोणीही वारसा हक्क नसताना त्यांनी सिनेविश्वात आपलं स्थान निर्माण केलं आहे. यापैकी एक म्हणजे अभिनेता राजेश भोसले. राजेश यांनी आजवर अनेक मराठी मालिकांमधून आणि चित्रपट, नाटकांमधून रसिकांच्या मनात घर केलं. बरेचदा इन्स्पेक्टर, हवालदार, वकील अशा भूमिका साकारत राजेश यांनी सिनेरसिकांचं मन जिंकलं. सध्या राजेश यांचं हिंदी भाषेतील एक नाटक देशात आणि देशाबाहेरही दिसतंय. पण अभिनय क्षेत्रात काम करताना राजेश यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
राजेश भोसले यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी नायक म्हणून काम करायची इच्छा व्यक्त केली, आणि ही इच्छा त्यांची का पूर्ण झाली नाही याचं कारणही सांगितलं. राजेश यांनी म्हटलं, “‘शोभायात्रा’ नावाचा मी जेव्हा सिनेमा केला तेव्हा विनायक म्हणून प्रयत्न करत होतो. कारण त्यावेळेला थोडीशी बॉडी वगैरे माझी झाली होती. त्यावेळी थोडासा मी प्रयत्न केला होता. पण मला संधी मिळाली नाही. त्यानंतर मग किती वर्ष वाट बघत राहायची. नकार ऐकण्याबाबत बोलायचं झालं तर काही ठिकाणी नाटकांमध्ये आता नाव नाही सांगू शकत, पण त्यावेळेला असं म्हणाले की, नाटकांत काळा नायक नाही चालत. असं मला सांगण्यात आलं होतं की, नाटकांत काळा हिरो नसतो ना…नाहीतर तू चांगलं काम करतोस”.
पुढे ते म्हणाले, “आणि सिनेमांत मी प्रयत्न केले पण त्यावेळी आता काही रोल नाही तुझ्यासाठी, असे तर नक्की सांगेन असं म्हटलं. त्यानंतर मग मी टीव्ही, सिरियलकडे वळलो. आणि तिथे मी माझ्या नायक बनण्याची इच्छा पूर्ण करू लागलो. मला तिकडे तसे रोल मिळत गेले. मी ‘वेतोबा’ मालिका केली, ‘दुनियादारी’ केली, ‘अगं बाई सासूबाई’ केली, ‘विठूमाऊली’ केली, तिथे मला माझ्या मनासारखं काम करता आलं. माझी नोकरी नसल्याने आपलं फुल टाइम अभिनय क्षेत्रात असल्याने, आणि मालिका हे एक असं माध्यम आहे ज्यात एक चांगली रक्कम मिळते. महिन्यातील २०-२५ दिवस काम केल्याने एक चांगली रक्कम हातात येते. कालांतराने मी घर घेतलं. मी विरारमध्ये वन रूम किचनमध्ये राहत होतो, आज माझा विरारमध्ये टेरेस फ्लॅट आहे. आणि गोरेगांवला आई-वडिलांचं घर आहे. आणि आता मला मुंबईत यायचंय, मुंबईतील विलेपार्ले येथे स्वतःच घर घ्यायचं आहे हे माझं स्वप्न आहे”.





