Dahavi A In Mumbai Indians Live Show : ‘आठवी-अ’ नंतर आता ‘दहावी-अ’ या मराठी वेबसीरिजची सर्वत्र हवा आहे. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभ्या आणि त्याच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे दाखवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमधून व शहरांमधून या सीरिजला लोकप्रियता मिळाली. आता तर या सीरिजच्या लोकप्रियतेमुळे यामधील सगळीच पात्र घराघरांत पोहोचली आहेत. प्रत्येक पात्राने स्वमेहनतीच्या जोरावर यश कमावलं. सातारा, सांगली, कोल्हापूर यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वेबसीरिजला भरभरुन प्रतिसाद मिळतोय. ‘दहावी-अ’ला भरभरुन यश मिळत असताना आता ही टीम पोहोचली आहे मुंबई दर्शनाला.
‘दहावी-अ’मधील अभ्या, केवडा, रेश्मा, मध्या, किरण, इक्या, सागर ही सात मुलं सध्या मुंबई दर्शन करण्यात व्यस्त आहेत. मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेत त्यांनी या मुंबई प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मुंबईतील विविध ठिकाणाला ही मुलं भेट देणार आहेत. त्यातीलच एक मोठं सरप्राइज म्हणजे IPL. ‘दहावी-अ’च्या मुलांना मुंबई इंडियन्सची मॅच पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबरीने मॅच सुरु असताना स्टुडिओमध्ये उपस्थित राहून गप्पा मारता येणार आहेत.
‘दहावी-अ’ची संपूर्ण टीम मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाली आहे. ही मुलं मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण टिमला अगदी जवळून पाहणार आहेत. यासंदर्भातील एक व्हिडीओ ‘इट्स मज्जा’ वर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये मध्याने मुंबई इंडियन्सच्या Live Show ला हजेरी लावणार असल्याचं सांगितलं आहे. ‘दहावी-अ’ची टीम मुंबई इंडियन्सच्या लाईव्ह शो धमाल-मस्ती करणार आहे.
आणखी वाचा – चार मुलींवर बापाकडूनच बलात्कार, त्यांचा खून…; अलका कुबल भडकल्या, म्हणाल्या, “काय सोडायचं?”
व्हिडीओमध्ये अभ्या म्हणजेच अथर्व अधाटे ही आनंदाची बातमी देत आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला, “तुम्ही ‘दहावी-अ’चा क्रिकेटचा एपिसोड बघितला असेल, त्यावर भरभरून कमेंट्ससुद्धा केल्या. तुम्हाला यावेळी लहानपणीची आठवणही आली असेल. गावाकडचा खेळ बघता बघता तुम्ही आम्हाला मुंबई इंडियन्सच्या Live Show वर बघू शकता. आम्हाला बघायला विसरू नका १३ एप्रिलला ठीक संध्याकाळी ६:३० वाजता MI च्या Social Media Channel वर भेटूया आणि मज्जा करुया”. एकूणच काय तर ‘दहावी-अ’ची टीम आता धमाल, राडा करणार एवढं नक्की.