स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं. यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौडही अजूनही चालूच आहे. जुई ही गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असली तरी तिने खडतर प्रवास करत आताचे स्थान प्राप्त केलं आहे.
सध्या ती स्टार प्रवाहवरीलच ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत असून तिची ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी जुई याआधी अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. अशातच तिने नुकत्याच ‘कॉकटेल स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या संघर्षाच्या काळात अनेक वेदनादायी प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा – तितीक्षा तावडे तिच्या मुलांनाही ‘सातव्या मुलीची…’ची गोष्ट सांगणार, म्हणाली, “नेत्राची गोष्ट…”
जुईने तिला एका सहअभिनेत्रीने चक्क कानाखाली मारली असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. याविषयी बोलताना जुईने असं म्हटलं की, “माझा एक कीव येणारा अनुभव सांगायचा झाला तर, आज ती व्यक्ती खूप मोठी लेखिका आहे. त्यांच्याबरोबर मी एका मालिकेत काम करत होते. ही २००९-१०ची गोष्ट आहे. कानाखाली मारायचा एक सीन होता. तेव्हा दिग्दर्शकाने अॅक्शन म्हणायच्या आत मला कानाखाली पडली होती. तेव्हा मी खूप नाजुक होते आणि ज्या व्यक्तीने मला मारलं होतं ती जवळपास ५-६ फुटाची धष्टपुष्ट होती. त्यामुळे तिने मारल्या-मारल्या माझ्या कानातून आवाज येऊ लागला आणि काय झालं हे मला कळलच नाही”.
आणखी वाचा – “बिहारमध्ये येऊ देणार नाही”, झहीर इक्बाल लग्न केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाला धमकी, पोस्टरही लावले अन्…
पुढे ती असं म्हणाली की, “त्या सीनला मी प्रतिक्रिया दिलीच नाही, त्यामुळे तो सीन कट झाला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टेकला मला पुन्हा एकदा कानाखाली बसली आणि माझ्यावर टीममधील सगळी मंडळी हसत होती. त्यानंतर तिसरा, चौथा टेक झाला आणि ५-६ वेळा मला कानाखाली पडली. मी रडायला लागली. त्यानंतर काही दिवसांनी मला कळलं की, असे सीन करताना ते शॉट चुकवता येतात. ज्या व्यक्तीने मला कानाखाली मारली त्या व्यक्तीला असं मला त्रास देऊन नक्की काय मिळालं. सर्व युनिटसमोर मला अपमानित करुन त्यांना काय मिळालं माहीत नाही. पण यामुळे माझ्या मनात त्या व्यक्तीविषयी अजिबातच आदर नाही”.