tharala tar mag purna aaji dance : गेली अडीच वर्ष ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथानकाबरोबरच मालिकेतील कलाकारही लोकप्रिय झाले. पूर्णा आजी, सायली, अर्जुन, कल्पना, प्रताप, साक्षी, प्रिया यांसारखी अनेक पात्र घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेतील सायली-अर्जुन या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. याप्रमाणेच पूर्णा आजी या पात्रानेही प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेच्या शूटसाठी मालिकेतील कलाकार आणि इतर टीमही मेहनत घेताना दिसते. मालिकेतील कलाकार आणि टीमचे खास बॉण्डिंग आपल्याला नेहमीच पाहायला मिळाले आहे.
या मालिकेतील इतर कलाकार सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. सेटवरील अनेक रील व्हिडीओ, सेटवरचे अनुभव ही कलाकार मंडळी चाहत्यांसह शेअर करतात. अशातच या मालिकेतील एका खास व्यक्तीचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मालिकेत नेहमीच कठोर, निर्णय घेणाऱ्या भूमिकेत असणाऱ्या पूर्णा आजींचा आहे.
पूर्णा आजीचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारत आहेत. मात्र या मालिकेत त्या दिसल्यापासून त्यांना पूर्णा आजी ही ओळख मिळाली आहे. पूर्णा आजींनी त्यांची मेकअप आर्टिस आणि हेअर स्टायलिस्ट संजनाबरोबर व्हिडीओ बनवला आहे. आणि हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूर्णा आजी ५७ वर्ष जुन्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
आणखी वाचा – नेहमीच चर्चेत तरीही कामासाठी वणवण; हिना खानची खंत, म्हणाली, “कर्करोग झाला तेव्हापासून…”
अर्थात पूर्णा आजींचा हा डान्स तरुणाईलाही लाजवेल असा आहे. पूर्णा आजीने ‘कजरा मोहोब्बत वाला, अखिंयों में ऐसा डाला’, या जुन्या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. १९६८ साली किस्मत चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे आणि रसिकांना थिरकायला भाग पाडत आहे. या गाण्यावर डान्स करण्याचा मोह पूर्णा आजींनाही आवरला नाही. उत्तम हावभाव, हातवारे करत त्यांनी केलेल्या नृत्याने साऱ्यांचे मन जिंकले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होताना पाहायला मिळत आहे.





