Monika Dabde News : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन झाले. १६ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक समोर आलेल्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. ज्योती चांदेकर ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करत होत्या. या मालिकेतील पूर्णा आजी या पात्रामुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यांच्या निधनानंतर मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री मोनिका दबडे हिलाही पूर्णा आजीच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला. मोनिकाने काही महिन्यांपूर्वीच लेकीला जन्म दिला. लेकीला तीन महिने होताच ती सेटवर परतली. आणि सेटवर ती तिच्या चिमुकल्या लेकीलाही घेऊन जायची. त्यामुळे पूर्णा आजी म्हणजेच ज्योती यांचे तिच्या लेकीला आशीर्वाद मिळाले.
ठरलं तर मग मालिकेत मोनिका गरोदर असताना तिची ज्योती यांनी बरीच काळजी घेतली. काळजीचं नव्हे तर त्या तिचे डोहाळेही पुरवायच्या. बरेचदा त्या घरुन मोनिकासाठी सात्विक जेवण घेऊन यायच्या. आता मोनिकाने पुन्हा एकदा त्यांची आठवण काढली आहे. मोनिका जेवणाचे अनेक व्हिडीओ बनवून नेहमीच शेअर करते. अशातच आता मोनिकाने ज्योती यांनी तिच्यासाठी आणलेला खास पदार्थ बनवला. याचा व्हिडीओ शेअर करत मोनिका म्हणते, “आज मी पूर्णा आजीला जसे आवडायचे तसे मुगाचे अप्पे बनवले होते. गेल्या काही दिवसांपासून माझं कशातच मन लागत नव्हतं. याचं कारण सर्वांनाच माहीत आहे. आता खूप दिवसांनी व्हिडीओ सीरिज पुन्हा शेअर करण्यास मी सुरुवात केली आहे”.
आणखी वाचा – लाकडी थीम, गुप्त खोल्या, १०० कॅमेरे अन्…; Bigg Boss 19 च्या घराची पहिली झलक, फोटो समोर
पुढे ती म्हणाली, “आता काय बनवायचं हा प्रश्न समोर होता म्हणूनच, मी पूर्णा आजीने मला प्रेग्नन्सीमध्ये जसे मुगाचे अप्पे खाऊ घातले होते तेच अप्पे बनवायचा निर्णय घेतला. त्याची रेसिपी मी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करतेय. मी रात्रभर मूग भिजवून ठेवले होते. या मुगामध्ये मिरची, आलं-लसूण आणि थोडासा रवा घालायचा. हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेतले. त्यानंतर या मिश्रणात मीठ, जिरे आणि थोडंसं पाणी घातले, त्यानंतर हे सगळे परत वाटून घेतले. अप्पे बनवायचा तवा घ्यायचा, ते बॅटर तव्यात तेल घालून वरुन घालायचं. यात तुम्ही थोडा इनो किवा बेकिंग सोडा टाकू शकता. मी असं काही घातले नाही आहे”.
आणखी वाचा – “मी जिवंत आहे”, निधनाची खोटी बातमी देताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते भडकले, म्हणाले, “स्पष्टीकरण देऊनही…”
पुढे मोनिका म्हणाली, “मला पूर्णा आजी हे अप्पे चटणीबरोबर खायला द्यायची पण, आज मी केचअपबरोबर खातेय. अस्मिता आणि पूर्णा आजी असे बरेच सीन आम्ही एकत्र केले. खूप मजा केली, एकत्र गमतीजमती केल्या. तिने वृंदाला कसं मोठं कर याच्याही टिप्स मला दिल्या होत्या. पूर्णा आजी हे सगळं करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. लव्ह यू आणि मिस यू”, असं सांगत मोनिकाने तिच्या भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या आहेत.





