टेलिव्हिजनवरील जुनी लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ ही आज इतके वर्ष उलटून गेले तरीही खूप चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. याबद्दल मुख्य अभिनेते मुकेश खन्ना यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. यावेळी मुकेश स्वतः शक्तिमानच्या वेशात दिसून आले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही चाहत्यांनी उत्सुकता दर्शवली तर काहींनी त्यांना ट्रोलदेखील केले. मात्र मुकेश हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठीदेखील खूप चर्चेत असलेले पाहायला मिळतात. नुकताच त्यांनी अभिनेता अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. अक्षयने चित्रपटात पृथ्वीराज चौहान ही भूमिका साकारली होती. यावरुनच मुकेश यांनी अभिनेत्याला सुनावले आहे. (mukesh khanna on akshay kumar)
‘शक्तिमान’ या मालिकेचा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. यामध्ये रणवीर सिंह शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याचेदेखील बोलले गेले. मात्र रणवीर ही भूमिका साकारणार याला मुकेश यांनी नापसंती दर्शवली. नंतर पुन्हा ते स्वतः शक्तिमानच्या वेशात दिसून आले. मात्र लोकांना हे पसंत पडले नाही. यामुळे मुकेश यांचा एक व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामध्ये त्यांनी अक्षयवर रोख धरला आहे.
मुकेश यांना शक्तिमानच्या वेशात पाहून लोकांनी खिल्ली उडवली त्यावरुन मुकेश म्हणाले की, “फक्त शक्तिमान आहे असं वाटायला हवं. अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान का वाटला नाही? विग लावला, मिशी लावली म्हणून पृथ्वीराज होता येत नाही. त्यासाठी चांगली वेशभूषा करणे गरजेची आहे”. दरम्यान मुकेश यांच्या विधानावर नेटकऱ्यांनीदेखील त्यांना चांगलेच सुनावले आहे.नेटकरी म्हणाले की, “अक्षयने दिग्दर्शकांच्या मागणीनुसार काम केले. मग तो दोषी कसा? पण दिग्दर्शक व निर्मात्यांना हे समजणं गरजेचं होतं की ते एक चित्रपट बनवत आहेत डॉक्युमेंट्री नाही”. तसेच काही नेटकऱ्यांना मुकेश यांचे बोलणे पसंत पडले नाही. तसेच एका चॅट शोमध्ये शाहरुख खान, सलमान खान व अक्षय यांच्याबद्दलदेखील भाष्य केले आहे.
मुकेश म्हणाले की, “शाहरुख, सलमान व अक्षय हे खूप गुणी अभिनेते आहेत. जेव्हा ते समोर येतील तेव्हा शाहरुख पठाण म्हणून, सलमान भाईजान म्हणून, अजय सिंघम म्हणून व अक्षयब ‘हेरा-फेरी’मधील राजू म्हणूनच आपल्याला दिसतील”. तसेच ते एकदा म्हणाले होते की, “मी आधीपासूनच शक्तिमान आहे. दुसरा शक्तिमान तेव्हाच असेल जेव्हा दुसरा कोणी ही भूमिका साकारेल. पण मीच शक्तिमान आहे माझ्याशिवाय ही भूमिका दुसरं कोणीही ही भूमिका सकारू शकत नाही”.