रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. गेले अनेक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांचा मोठा चाहतावर्ग आहे. राजकारणामध्येही ते सक्रिय आहेत. मात्र आता ते कोणत्याही मालिकेमुळे किंवा राजकीय मुद्दयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. देशात सध्या महाकुंभ सुरु आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातून अनेक भाविक हजेरी लावत आहेत. अरुण यांनीदेखील या मेळ्यामध्ये सहभाग घेतला. यावेळचे त्यांचे फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. (arun govil at mahakumbh 2025)
अरुण यांनी पवित्र त्रिवेणी संगम गंगा, यमुना व सरस्वतीमध्ये डुबकी मारली. अनुष्ठान स्नान केल्यानंतर त्यांनी शुभेच्छा देत लिहिले की, “आई गंगा, आई यमुना व आई सरस्वती सर्वांचा आशीर्वाद मिळूदे”. तसेच त्यांनी अजून लिहिले की, “मला प्रयागराजमध्ये पवित्र त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान करण्याचे सौभाग्य मिळाले. आस्था, एकता समानता व सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळ्याचे प्रतीक असलेला महाकुंभ २०२५ सनातन संस्कृतीचे हे एक महापर्व आहे. हे आपल्या देशाचे समृद्ध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक विरासत दिसून येते. आई गंगा, आई यमुना व आई सरस्वती सगळ्यांचे कल्याण करो”.
तसेच अरुण यांनी एका भंडाऱ्यामध्ये भक्तांना प्रसादाचे वाटप केले. त्यांची भेट तेथील बाबा बागेश्वर धाम सरकार धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांच्याशी झाली. त्यांनी त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले की, “आज मला प्रयागराजमध्ये पूज्य बाबा बागेश्वर धाम सरकार धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. जय श्री राम”.
दरम्यान अरुण जेव्हा भक्तांमध्ये प्रसाद वाटत होते तेव्हा अनेक लोकांनी त्यांच्या समोर येऊन पाया पडून आशीर्वाद घेत होते. अनेकांनी त्यांच्या नावाचा जयजयकारदेखील केला. प्रसाद घेतल्यानंतर भक्तांनी जय श्री राम असा जयघोषदेखील केला.