Yek Number Trailer : मराठी मनोरंजन विश्वातील एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने एकत्र येऊन चित्रपट करणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासूनस सुरु होती. या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार असल्याच्या चर्चांना अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं आणि हा चित्रपट म्हणजे ‘येक नंबर’. या चित्रपटाच्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टर आणि टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Yek Number Trailer News)
२५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित एका भव्य कार्यक्रमात ‘येक नंबर’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला मराठी मनोरंजन विश्वातील मंडळी, बॉलिवूडकर आणि राजकारणातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. राज ठाकरे, अभिनेता आमिर खान, चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, साजिद आणि वरदा नाडियाडवाला, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव यांच्यासह चित्रपटातील कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंधित असणाऱ्या ‘येक नंबर’ या चित्रपटाचीही चर्चा आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 चा महाचक्रव्यूह टास्क जिंकण्यासाठी पॅडी व सूरज यांची दमछाक, बाजी मारणार का?
या चित्रपटाच्या ट्रेलरमधील राज ठाकरे, त्यांच्या शीवतीर्थावरील सभा आणि त्यांचा लोकप्रिय ‘जमलेल्या माझ्या तमाम…’ या डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. राज ठाकरेंना आपल्या गावात आणण्याच्या प्रियसीच्या इच्छेखातर एका तरुणाचा संघर्ष या चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याचे या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ‘येक नंबर’मध्ये अभिनेता धैर्य घोलप महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर त्याच्याबरोबर ‘झुंड’, ‘घर बंदूक बिर्याणी’ फेम अभिनेत्री सायली पाटीलही मुख्य भूमिकेत आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘येक नंबर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी आणि बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी केले असून मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या संगीताची भुरळ घालणारे संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या सिनेमाच्या निर्मितीसाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला या एकत्र आल्या आहेत.