तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (३ एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी मोजली गेली असून या तीव्रतेचा भूकंप हा धोकादायक श्रेणीत मोडतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तैपेईच्या अनेक भागांत वीज गेली आहे. भूकंपामुळे अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आणि रस्त्यांना भेगा पडल्या. हाअ भूकंप तैवानमधील गेल्या २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे म्हटले जात आहे. भूकंपानंतर लगेचच शेजारील देश जपान सतर्क झाला आणि त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लोकांना सखल भाग सोडून उंच ठिकाणी जाण्यासही सांगण्यात आलं आहे.
भूकंपाची तीव्रता लक्षात घेता जपान आणि इतर शेजारील देशांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तैवान हा एक असा देश आहे जिथे भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात. याचे कारण या देशाची भौगोलिक स्थिती आणि रचना आहे. दरम्यान, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे कोणीतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची बातमी अद्याप मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि इमारती कोसळल्याच्या बातम्या आहेत. ‘व्हॉल्कॅनो डिस्कवरी’च्या अहवालानुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची खोली ३५ किमी होती आणि देशाच्या मोठ्या भागात हा भूकंपचा धक्का जाणवला.
तैवानचा शेजारी देश जपाननेही भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीने ३ मीटर (१० फूट) उंचीपर्यंत त्सुनामीच्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना ओकिनावाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ‘नवभारत’च्या वृत्तानुसार, तैवानच्या पूर्व भागात जोरदार भूकंप झाल्यानंतर, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की भूकंपाची तीव्रता ७.४ होती आणि त्याचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून १८ किलोमीटरवर होता. तैवानमधील या भूकंपाचा प्रभाव जपानमध्येही दिसून आला.
तैवानमधील आजच्या या भूकंपामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिकजण जखमी झाल्याचे वृत्तदेखील समोर येत आहे. दरम्यान, सप्टेंबर १९९९ मध्ये ७.६ तीव्रतेच्या भूकंपात तब्बल २ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०१८ मध्ये, हुआलियन शहरात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. ज्यामध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० लोक जखमी झाले होते.