तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे जगविख्यात उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते.त्यांना गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या वृत्ताने भारतीय संगीतविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीदेखील झाकीर हुसैन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
सलील कुलकर्णी यांनी झाकीर हुसैन यांचा फोटो पोस्ट करत “आज तालाचं आवर्तन समेवर येण्यापूर्वी असं का थांबलं? उस्तादजी तुमचं असणं फार महत्त्वाचं होतं” असं म्हटलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर स्वप्नील जोशीनेही झाकीर हुसैन यांच्या निधनावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. “पण या सम हाच, अलविदा झाकीरजी” अशा मोजक्या शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर गायिका बेला शेंडेनेही “हे दुःख पचवणं जरा जड आहे” अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन, परदेशात सुरु होते उपचार, चित्रपटसृष्टीवर शोककळा
लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने “सूर पोरके होतात ऐकलं होतं, आज पहिल्यांदाच ताल अनाथ झाला असं वाटलं” असं म्हणत आपलं दुःख व्यक्त केलं आहे. तसंच गायिका वैशाली माडेने “एका युगाचा अंत झाला” असं म्हणत आपली भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनीही . “एक उस्ताद ज्याने तालाला आत्मा दिला आणि प्रत्येक थाप अविस्मरणीय बनवली. त्यांची कलात्मकता जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. तो क्षण मी कायम जपेन. जगाने एक रत्न गमावले आहे, परंतु त्याचा वारसा पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनीत होईल. उस्तादजी, तुमची खूप आठवण येईल” असं म्हणत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – 16 December Horoscope : मेष, सिंह व क्रर्क राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस आर्थिक लाभचा, जाणून घ्या…
दरम्यान, झाकीर हुसेन हे संगीत जगतातील एक मोठे नाव होतं. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म १९५१ मध्ये मुंबईत झाला. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे. झाकीर हुसैन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मात्र त्यांकया निधनाच्या वृत्ताने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.