लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरचरण सिंग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यावर्षी २२ एप्रिल रोजी हा अभिनेता दिल्लीतून बेपत्ता झाला होता. सुमारे महिनाभरानंतर तो आपल्या घरी परतला आहे. काही दिवसांपूर्वी, जेव्हा गुरुचरणला विमानतळावर स्पॉट केले गेले तेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो पुन्हा एकदा शोमध्ये सोढीच्या भूमिकेत लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे का?. यावर अभिनेत्याने उत्तर देत म्हटलं की, “देव जाणो. मला काहीच माहीत नाही. मला कळताच मी तुम्हाला नक्की कळवेन”. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
आता नुकतेच गुरुचरण सिंग ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोच्या सेटवर निर्माता असित मोदी यांच्याबरोबर दिसले. यावेळी असित मोदी म्हणाले की, “गुरुचरण सिंह हा माझ्या कुटुंबासारखा आहे. तो बराच काळ आमच्याशी जोडला गेला होता. मात्र काही वैयक्तिक समस्यांमुळे अभिनेत्याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडला होता”. मात्र, आता तो शोचे निर्माते असित मोदी यांना भेटला असून, त्याच्या या मालिकेत पुनरागमन झाल्याची अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग उर्फ रोशन सिंग सोधी २२ एप्रिलपासून बेपत्ता झाला होता आणि जवळपास एक महिन्यानंतर तो अखेर घरी परतला होता. गुरुचरण सिंह २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला निघाला होता. पण एअरपोर्टपर्यंत तो पोहोचला नाही. गुरुचरण यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या वडिलांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली.
दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी रोहित मीणा यांनी एक अपडेट देत असे सांगितले होते की, त्यांना काही समस्या येत होत्या ज्यामुळे ते धार्मिक यात्रेला गेले होते. परत आल्यानंतर गुरुचरण सिंह यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, ते अमृतसर व लुधियाना येथील गुरुद्वारांमध्ये वास्तव्यास होते.