Sonalika Joshi Lovestory : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने त्यांच्या हटके अभिनयशैलीने साऱ्यांची मन जिंकली आहेत. या कलाकार मंडळींना प्रेक्षकांनी आपलंस केलं आहे. यावरुन मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मालिकेतील कलाकार आता साऱ्यांच्या घरातील अविभाज्य भाग आहेत. या मालिकेत इतर पात्रांपैकी माधवी भाभी हे पात्रही तितकेच लोकप्रिय आहे. ही भूमिका अभिनेत्री सोनालिका जोशी साकारत आहे. सोनालिकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्याबाबत, करिअरमधील प्रवासाबाबत बरंच भाष्य केलं आहे.
सोनालिकाने नुकतीच ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना सोनालिकाने तिच्या लव्हस्टोरीबाबत भाष्य केलं. माधवी भाभीचे रिअल लाईफ भिडे कसे आहेत?, त्यांच्याशी तिचं कसं जुळून आलं याबाबत तिने भाष्य केलं. यावेळी बोलताना सोनालिका म्हणाली, “आमची अशी लव्हस्टोरी नाही आहे. मी आधीपासून ठरवलं होतं की प्रेमात पडायचं नाही. माझं असं आहे की एकदा जीव लावला की लावला, मग त्यात दगा, विश्वासघात वगैरे झालं की संपलं. आणि प्रेमात असं झालं तर मला सहन झालं नसतं. यामुळे आपण काही असं करायचं नाही हे मी ठरवलं. त्यावेळी मला इतकं काम होतं की मी एकाचवेळी पाच-पाच मालिका करत होते. लग्नाच्या आधीही मी फक्त दहा दिवस सुट्टी घेतली होती. तेव्हा आई मला म्हणाली, चार दिवस ग्रहमख असणार आहे त्यामुळे तू बाहेर जाऊ नकोस आणि आधीच मला काय ते सांग. माझ्या आईची मावशी पालगडला राहते. तिच्या समोरच्या बंगल्यात एक डॉक्टर कुटुंब राहतं”.
पुढे ती म्हणाली, “माझे सासरे, सासू, दीर, जाऊ डॉक्टर आहेत. गावातील नावाजलेलं हे कुटुंब आहे. एका लग्नात माझी आणि समीरची पहिल्यांदा भेट झाली. यावेळी मी आणि माझी आई आम्ही दोघी गेलो होतो. तिथे भेटल्यानंतर निघतेवेळी ते म्हणाले की, तुम्ही दोघी आहात तुम्हाला नेरुळला सोडायचं का?, आम्ही त्याच मार्गाने जाणार आहोत तर आम्ही तुम्हाला या फाट्यावर उतरवतो, असं सांगितलं आणि आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. येतेवेळी ते म्हणाले, इथे महडचा गणपती आहे तर आपण दर्शन घ्यायचं का?, आम्ही सुद्धा तयार झालो. त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश घेताना मी आणि समीरने एकत्र प्रवेश केला. दर्शन वगैरे झालं. त्यानंतर आम्ही घरी गेलो”.
लव्हस्टोरीबाबत बोलताना सोनालिका पुढे म्हणाली, “काही दिवसांनी सासूबाईंकडून चौकशी आली. मला तोपर्यंत पार्ल्यातील भरपूर श्रीमंत स्थळ येऊन गेली होती पण त्यांनी काम सोडून घर सांभाळायचं ही अट घातली. यावर मी स्पष्ट नकार दिला. मला असा नवरा हवा होता ज्याचं काहीच बॅकग्राउंड नसेल आणि आम्ही दोघे मिळून ते विश्व उभं करु. मी त्यावेळी याच विचारांची होते. बोलणी वगैरे झाल्यावर एकदा भेटायचं ठरलं. त्यावेळी मी त्याला विचारलं, मी माझं काम सुरु ठेवणार, यावर त्याने होकार दिला. आणि तुझं काम मी आधीपासून पाहिलं आहे छान काम करतेस असं तो म्हणाला. त्यावेळी तो विरारमध्ये भाड्याने राहत होता. मला विरारहून प्रवास करणं शक्य नव्हतं हे त्याला कळलं तेव्हा त्याने विलेपार्ले येथे भाड्याने घर घ्यायचं ठरवलं, सीएचं काम करणारा हुशार मुलगा, शिवाय सुशिक्षित कुटुंब हे सगळं जुळून आणि आमचं लग्न झालं”.