Siddharth Jadhav Wife : अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मध्यंतरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याची पत्नी तृप्ती हिने सोशल मीडियावरुन जाधव हे सासरचं आडनाव हटवल्यानंतर दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचे सर्वत्र म्हटलं जात होतं. मात्र या चर्चांवर सिद्धार्थने भाष्य करत त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत अफवा पसरल्या असल्याचं म्हणत स्पष्टीकरण दिलं. अभिनेत्याची पत्नी तृप्ती उत्तम उद्योजिका आहे. आज ती व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून नामवंत उद्योजिका आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने उद्योजिका होण्याचा निर्णय का घेतला याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान खुलेपणाने भाष्य केलं आहे.
सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने ‘बातो बातों में’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिला व्यवसाय क्षेत्रात कशी आली याबाबत विचारण्यात आले. याचे उत्तर देताना तृप्तीने एक किस्सा सांगितला. तृप्ती म्हणाली, “२०१३ ला मी ब्रेक घेतला. त्यानंतर मी घर, मूल,चूल हे सगळं करत होते. सिद्धू त्याच्या कामात व्यस्त असल्याने या गोष्टींकडे मी लक्ष देत होते. त्यानंतर कोविडचा काळ सुरु झाला. २०२० ची ही गोष्ट आहे. नवरा-बायकोमध्ये छोटी-मोठी भांडणही होत असतात. तेव्हा बोलता बोलता सिद्धू मला बोलून गेला तुला कोण ओळखतं?, तुला सगळे माझ्यामुळेच ओळखतात, तुझी स्वतःची अशी काय ओळख आहे? तुला सगळे सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून ओळखतात. मला ती गोष्ट खूप लागली. तो हे बोलला हे त्याच्या लक्षातही नसेल पण मी या त्याच्या बोलण्याचा बसून खूप विचार केला”.
पुढे ती म्हणाली, “माझी स्वप्न काय आहेत? याचा मी विचार केला. एक आई म्हणून मी कायम माझ्या मुलींचा सांभाळ करणार, दोन मुलींना जन्म दिला म्हणजे त्यांचं मला सर्व करावंच लागणार. नवरा आपल्या व्यस्त आहे हे मला माहित आहे. पण एखाद्या बाईच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा खरंच विचार करायला भाग पाडतं. तेव्हा मी नोकरीच्या शोधात होते, पण पुन्हा तेच की सिद्धू चित्रीकरणात व्यस्त असल्याने मुलींना सांभाळावं लागायचं, त्यांच्याकडे कोण पाहणार?, त्यांना वेळ देऊ शकू का?. वयाच्या १९-२० व्या वर्षांपासून मला उद्योजिका व्हायचं होतं आणि हे मी सिद्धूलाही बोलून दाखवलं. तेव्हापासून स्वतःच असं काहीतरी असायला हवं असं वाटायचं. आणि त्यावेळी ती गोष्ट माझ्या डोक्यात आली आणि मी विचार केला की आता काहीतरी करायला हवा. एक वाईट काळ आला की उंच उडी घेणं गरजेचं आहे”.
व्यवसायाबाबत बोलताना तृप्ती म्हणाली, “कोविडच्या पहिल्या फेजनंतर माझ्या बिल्डिंगमधील माझ्या मैत्रिणीने मला लॅक्मे फ्रेंचाइजीबाबत सांगितलं. ब्युटी या क्षेत्राबाबत मला आधीपासून आवड होती. मग जेव्हा भांडवलीचा मुद्दा आला तेव्हा माझ्यातील इगो मध्ये आला. नवऱ्याने आपल्याला असं बोलल्यानंतर आता त्याच्याकडे कसे पैसे मागायचे?. आपल्याकडे जे पैसे आहेत ते आपण संसारासाठी वापरतो. तेव्हा ५० लाखांची गरज होती. तुम्ही विश्वास ठेवणार नाही मी हे सिद्धूला सांगितलं नाही, त्याच्याकडून पैशाची मदतही घेतली नाही. मी आणि माझ्या मैत्रीने बाहेरुन ८ टक्क्यांवर अर्धे अर्धे पैसे जमवले. आणि हे सलून सुरु झालं तेव्हापासून आम्ही एकदाही बाहेरुन पैसे उचलले नाहीत आणि आज याला चार वर्ष पूर्ण होतील आम्ही घेतलेल्या लोनच्या ९०%रक्कम आम्ही भरली आहे. या शिवाय चार वर्षात माझं भांडवल मला येत होतं त्यातून मी खूप काही गोष्टी केल्या. लग्नानंतर आपण बायका हरवून जातो पण आपलं नाव लावणं हे मी त्यावेळी ठरवलं. सिद्धार्थ जाधवची बायको आहे हे मी खोडू शकणार नाही. सिद्धू मला ती गोष्ट रागाच्या भरात बोलला असेल खरं पण मला माझ्या अस्तित्वाची माझ्या स्वतःच्या नावाची तेव्हा आठवण झाली. त्यानंतर मी स्वतःचा ब्रँड निर्माण करायचं ठरवलं, आणि माझ्या मुलींच्या नावे स्वैरा एन्टरप्रायजेस नावाने कंपनी खोलली. आणि या अंतर्गत मी पैठणी साडीचे दुपट्टे आणि बनारसी साडीचा ब्रँड सुरु केला. अगदी दादरमध्ये मी या ब्रँडसाठी एक्झिबिशन्स केले. मला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्याचं मार्केट जाणून घेणं, त्याबद्दल माहिती मिळवणं मला योग्य वाटतं मग सेलिब्रिटीची पत्नी वगैरे असं लोक काय म्हणतात याचा मला फरक पडत नाही. आज मी सलूनमधून तो ऑनलाईन व्यवसाय करते”.