‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका असून गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे अनेक कलाकार एकेक करत ही मालिका सोडत असल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेते शरद सांकला यांच्याबाबत अशी बातमी आली होती, ज्याचे त्यांनी खंडन केले होते. त्यानंतर ‘मिस्टर भिडे’ म्हणजेच अभिनेता मंदार चांदवडकर हेदेखील या मालिकेला रामराम करणार असल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमधून ‘मिस्टर भिडे’ म्हणजेच मंदार चांदवडकर ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
युट्यूबवर मंदार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये हात जोडलेला त्यांचा फोटो असून त्यावर लिहिलंय की, ‘ते निर्मात्यांची पोलखोल करत आहेत आणि त्यांनी शो सोडला आहे’. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. हे पाहून मंदार चांदवडकरही आश्चर्यचकित झाले असून त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी ही मालिका सोडल्याची बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रेक्षक आणि चाहत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी अफवांवर लक्ष देऊ नका किंवा अफवा पसरवूही नका.
मंदार चांदवडकर यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी या असं म्हटलं आहे की, “नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कृष्णजन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ फक्त शुभेच्छा देण्यापुरता नाही तर मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचे आहे. अनेकांनी माझा व्हिडीओ पाहिला असेल, याच्या थंबनेलमध्ये लिहिले आहे की, गोलीला या शो मधून काढून टाकलं, आज मी ‘तारक मेहता का…’ सेटबद्दल संपूर्ण सत्य सांगेन, दया भाभी नाही येणार, मीदेखील शो सोडणार आहे. लोक सोशल मीडियाचा कसा गैरवापर करतात याचा असा व्हिडीओ पाहून मला आश्चर्य वाटलं आणि तितकंच दु:खही झालं आहे”.
मंदार यांनी पुढे असं म्हटलं आहे की, “तुम्ही व्हिडिओमध्ये आपण पाहत असलेली छायाचित्रे लाइव्ह स्ट्रीममधील आहेत, जी मी ‘तारक मेहता का…’ शो ला १६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पोस्ट केली होती. या सर्व अफवा आहेत. मित्रांनो, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका. ‘तारक मेहता का…’ शो २००८ पासून तुम्हा सर्वांचे मनोरंजन करत आहे आणि पुढेही ते करत राहील. फक्त खरं सांगायचं होतं, म्हणून ही रील पोस्ट केली. खूप कृतज्ञता आणि खूप प्रेम”.