‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका आहे. गेले अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यातील एक म्हणजे मिस्टर सोढी म्हणजे गुरुचरण सिंह होय. या मालिकेतील त्यांची भूमिका खूप पसंत केली. त्याच्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. मात्र त्यांच्याबद्दल मध्यंतरी एक असे वृत्त आले होते ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. (gurucharan singh on work)
काही महिन्यांपूर्वी गुरचरण यांच्या गायब होण्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना व घरच्यांना मोठा धक्का बसला होता. पोलिस स्टेशनमध्येही त्याबद्दल तक्रार करण्यात आली. मात्र पोलिसांनी तपास घेतला असता एका व्हिडीओ फुटेजशिवाय त्यांच्या हाती काहीही लागले नाही. मात्र २५ दिवसांनी ते स्वतः त्यांच्या घरी परतल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. आता स्वतः गुरुचरण यांनी त्यांच्या गायब होण्याबद्दल भाष्य केले आहे.
गुरुचरण गायब होणे हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे अनेकांनी म्हंटले. मात्र जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी आयुष्यात काहीतरी समस्या असल्याने आध्यात्मिकतेकडे वळल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र आता ते मुंबईमध्ये त्यांनी गायब होण्यावर माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना सांगितले की, करोनानंतर अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या. माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया असल्याने मी २०२० साली मुंबई सोडून पुन्हा दिल्लीला निघून गेलो. त्यांनंतर मी स्वतःचे काहीतरी सुरु करण्याचा प्रयत्न केला पण मला त्यामध्ये यश मिळाले नाही. काम व्यवस्थित झाले नाही किंवा ज्या लोकांबरोबर मी काम सुरु केले होते ते पळून गेले. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यामध्ये संपत्तीवरुन वाद-विवाददेखील सुरु आहेत त्यावर आमचे खूप पैसेदेखील खर्च झाले आहेत. या सगळ्यामुळे माझी आर्थिक स्थिती खूप खालावली आहे आणि मला यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे”.
पुढे ते म्हणाले की, “मी माझ्या आई-वडिलांमुळे खूप आध्यात्मिक झालो आहे. आयुष्यामध्ये मला जेव्हा निराशा आली तेव्हा मी देवाकडे धावलो. मी आध्यात्मिक यात्रेवर गेलो होतो. मला पुन्हा येण्याची इच्छा नव्हती. मला देवाने काहीतरी संकेत दिला आणि घरी परत येण्यास भाग पाडले. अनेक जण म्हणतात की मी हा पब्लिसिटी स्टंट केला आहे. पण हे खरं नाही. जर मला प्रसिद्धी हवी असती तर मी ‘तारक मेहता…’ च्या निर्मात्यांनी माझे अद्याप उर्वरित पैसे दिले नाहीत त्यावर बोललो असतो. हे करण्यासाठी मी सोशल मीडियाचा वापर केला असता पण मी असे केले नाही”.
त्यानंतर ते म्हणाले की, “घरी परतल्यानंतर मी कोणतीही मुलाखत दिली नाही. पण माझ्याबद्दल हे काही लोक बोलत आहेत त्याबद्दल मला बोलायचं आहे. मी इंडस्ट्रीमधील लोकांकडे मदत मागत आहे. मी परत आलो आहे आणि मला पुन्हा काम करायचे आहे. मला माझी सगळी कर्ज फेडायची आहेत आणि हे सगळं काम केल्यावरच शक्य आहे. मी मेहनत करण्यासाठी तयार आहे. जीवनातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मी आध्यात्मिक क्षेत्राकडेही जाऊ शकतो हे मला समजले आहे”.
गुरुचरण यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर , २०१३ साली त्यांनी ‘तारक मेहता…’ ही मालिका सोडली पण २०१४ मध्ये ते पुन्हा आले. त्यानंतर २०२० नंतर ते अभिनय क्षेत्रापासून दूर गेले.