Ganeshotsav 2024 : आज राज्यभरात लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. याचा मोठा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. श्री गणेशाचे आगमन दरवर्षी एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येते. यातून मंगलमय, पवित्र वातावरण निर्माण होते. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरीही दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. अशातच आज अनेक मराठी कलाकारांच्या घरीही लाडका बाप्पा आला आहे. अनेक मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढचे दहा दिवस सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकारांनी लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे व बाप्पा विराजमान झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाचं आगमन झालं आहे. तर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दरवर्षी तिच्या भावाच्या साथीने बाप्पाची सुबक मूर्ती घडवते. घरच्या घरी बाप्पाची मूर्ती घडवून सोनालीने मनोभावे पूजा केली आहे. अभिनेत्री सायली संजीवने देखील घरच्या बाप्पाची झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं आहे. यावेळी त्याच्याबरोबर आई, पत्नी व मुलगा देखील उपस्थित होते. त्याचबरोबर ‘मुरांबा’ फेम शशांक केतकरच्या घरीही लाडका बाप्पा विराजमान झाला आहे.
या शिवाय ‘आई कुठे काय करते?’ मालिका फेम रुपाली भोसलेनेदेखील आपल्या भावाबरोबर गणरायाला आपल्या घरी आणले. यचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच सायली संजीवनेही घरात बाप्पा विराजमान झाल्याचे खास फोटो सोशल मीडियावबर शेअर केले आहेत याशिवाय सुबोध भावे, रुचिरा जाधव, शरद केळकर, मिथीला पालकर अंकिता लोखंडे, सुशांत शेलार, व विवेक सांगळे यांसह कलाकार मंडळींनी आपल्या घरी मनोभावे लाडक्या बाप्पाचे मनोभावे स्वागत केलं आहे.
दरम्यान, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाला कलाधिपती मानले जाते. त्यामुळे या उत्सव काळात कलाविष्कारालाही उधाण येतं. आता पुढचे दहा दिवस सर्वत्र उत्साहाचं वातावरण असणार आहे. मराठी कलाकारांप्रमाणे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत.