छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये कधी आई तर कधी सासूच्या भूमिकेत अभिनेत्री सुलेखा तळवलकर घराघरांत पोहोचल्या आहेत. मराठी नाटक, मालिका व चित्रपटांतून त्यांनी कधी नायिका तर कधी खलनायिका म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या सुरेखा या सोशल मीडियावर तितक्याच सक्रिय असतात. युट्यूबवर त्या दिल के करीब या चॅनेलद्वारे अनेक कलाकारांच्या मुलाखती घेत असतात. यासंबंधीत काही माहिती तसेच त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.
अशातच सुरेखा यांनी नुकतीच केलेली एकपोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टद्वारे त्यांनी आपल्या लेकीचे कौतुक केले आहे. सुरेखा यांच्या मुलीला ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ हा पुरस्कार मिळाला असून सलग दोन वर्षे तिला हा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने सुरेखा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिचे कौतुक केले आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “टिया. मला वाटते मी सर्वात भाग्यवान आणि सर्वात आनंदी आई आहे. कोणत्याही आईला स्वप्नवत वाटेल अशी मुलं मला देवाच्या आशीर्वादाने मिळाले आहेत.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “बाळा, ज्याप्रकारे तू स्वतःला एक हुशार, सुंदर, मोहक, प्रतिभावान तरुणी म्हणून तयार केले आहेस ते अविश्वसनीय आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. सलग २ वर्षे ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ हा पुरस्कार मिळविल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. तुझ्या आईला तुझा अभिमान वाटतो पिल्लू. देव तुला खूप आशीर्वाद देवो. अशीच कायम उंच भरारी घेत राहा आणि मला माहित आहे की तू हे नक्कीच करशील. तुझ्या आईकडून तुला खूप खूप प्रेम.”
दरम्यान, सुरेखा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत सीमा मुकादम या भूमिकेतून त्या सर्वांचे मनोरंजन करत आहेत.