सुनिधी चौहान हे नाव सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत घेतल्या जाणाऱ्या गायकांपैकी एक नाव आहे. बॉलिवूडमध्ये तिने आपल्या आवाजाची जादू दाखवली. बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुनिधी चौहानने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सुनिधी, तिच्या व्यावसायिक जीवनातही खूप यशस्वी आहेच परंतु तिचे वैयक्तिक आयुष्य देखील बरेचदा चर्चेत असते. २००२ साली वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी अभिनेता बॉबी खानशी लग्न केले. मात्र वर्षभरातच त्यांचे हे लग्न तुटले. नुकतेच सुनिधीने एका मुलाखतीत तिच्या या तुटलेल्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. (Sunidhi Chauhan On Her First Marriage)
सुनिधी चौहान गेल्या २४ वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. सुनिधीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जेव्हा भाष्य केलं जात तेव्हा ती स्वतःहून याबाबत बोलणं टाळते. मात्र आता ‘बॉलिवूड बबल’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या गायिकेने अप्रत्यक्षपणे बॉबी खानसोबतच्या तिच्या अयशस्वी विवाहाबद्दल भाष्य केलं आहे.
तिच्या अयशस्वी विवाहाबाबत बोलत असताना सुनिधी म्हणाली, “मी खूप चुका केल्या आहेत. पण मी केलेल्या या चुकांची ऋणी आहे कारण मी जे काही आहे ते या चुकांमुळे आहे. जर त्या चुका झाल्या नसत्या तर मला खूप कंटाळा आला असता. मी आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींना मुकले असते. कारण एकदा का तुम्ही अंधाऱ्या बाजूला स्पर्श केलात, तरच तुम्ही त्यातून बाहेर पडाल आणि प्रकाश पाहू शकाल.”
पुढे सुनिधी असंही म्हणाली की, “मी त्या विवाहबंधनात असतानाही माझा चांगला वेळ वाया जात होता, मला माहित होते की मी चुकीच्या ठिकाणी आहे, पण मला हे देखील माहित होते की, मी चुकीच्या जागी जास्त काळ टिकणार नाही. मी यातून बाहेर पडणार होते. जर कोणी याबद्दल माझ्याशी बोलले तर, मी केवळ त्याकडे मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली असल्याच्या दृष्टिकोनातून पाहते”.
सुनिधी चौहानचे पहिले लग्न प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक अहमद खान यांचा भाऊ बॉबी खानसोबत झाले होते. वर्षभरानंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर ९ वर्षांनी सुनिधी चौहानने संगीतकार हितेश सोनिकसह लग्न केले. त्यांना आता ५ वर्षांचा मुलगाही आहे. त्याचे नाव तेग आहे.