सुलोचना यांचे मूळ नाव रंगू दिवाण. कोल्हापूरजवळच्या एका खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि कोल्हापूर काही चित्रपटात नगण्य अशा, एक्स्ट्राॅच्या भूमिका साकारत त्यांची वाटचाल सुरु झाली. दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या ‘महारथी कर्ण ‘, ‘वाल्मिकी ‘ अशा चित्रपटातही त्यांनी अशाच नगण्य भूमिका साकारल्या. पण त्यांच्याच ‘सासूरवास ‘ या १९४६ सालच्या चित्रपटात भूमिका साकारत असतानाच त्यांना भालजी पेंढारकर यांनी ‘सुलोचना ‘ हे नाव दिले. पण कसे? तर मूकपटाच्या काळात भालजी पेंढारकर यांच्या ‘बाजबहाद्दूर’ अर्थात ‘राणी रुपमती ‘ या चित्रपटात सुलोचना रुबी मायर्स या अभिनेत्रीने भूमिका साकारली होती तेव्हापासून ‘सुलोचना ‘ हे नाव भालजी पेंढारकर यांच्या अतिशय आवडते झाले होते आणि त्यांनी त्यानंतर आपल्या बोलपटात भूमिका साकारत असलेल्या नवतारकाना त्यानी सुलोचना हे नाव दिले. (Sulochana Latkar Real Name)
दोन तीनदा असे घडले. पण त्या अभिनेत्री त्यानंतर फारशी वाटचाल करु शकल्या नाहीत. पण त्यांनी ‘रंगू दीवाण ‘ची केलेल्या ‘सुलोचना ‘ यानी मात्र यश प्राप्त केले. आणि त्यानंतर हे नाव असे काही लोकप्रिय ठरले की मराठी चित्रपटाच्या सोज्वळतेचे प्रतिक म्हणून ‘सुलोचना ‘ ओळखल्या जाऊ लागल्या.

आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात सुलोचनादीदीनी ज्युनियर आर्टिस्ट अथवा एक्स्ट्राॅच्या भूमिका साकारल्या. १९४३ साली कोल्हापुरात निर्माण झालेल्या मा. विनायक यांच्या ‘चिमुकला संसार ‘ या चित्रपटात त्यांनी तशी भूमिका साकारत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि काही मराठी चित्रपटात एक्स्ट्राॅ म्हणून वाटचाल सुरु असतानाच कोल्हापूर येथे तेव्हा निर्माण झालेल्या तमिळ चित्रपटातही त्यांना अशा पध्दतीच्या कोणताही संवाद नसलेल्या अशा ज्युनियर आर्टिस्टच्याही भूमिका साकारल्या. अशी काहीशी दुर्लक्षित सुरुवात करुनही त्यांनी त्यानंतर घेतलेली झेप अगदी विलक्षण आहे.(Sulochana Latkar Real Name)
लेखक : दिलीप ठाकूर