Utkarsh Shinde Marathi video : काही दिवसांपासून हिंदी-मराठी भाषांमधील वाद उफाळून येताना पाहायला मिळाला. या वादावर अनेकांनी भिन्न-भिन्न प्रतिक्रिया दिल्या. अनेक कलाकार मंडळीही या वादावर आपले मत मांडताना दिसले. अशातच या हिंदी-मराठीच्या वादावर गायक उत्कर्ष शिंदेनेही आपले मत मांडले होते. उत्कर्ष त्याच्या गायनामुळे प्रसिद्ध झालाच याशिवाय त्याचा ‘बिग बॉस’मराठीच्या घरातील वावरही चर्चेत आला. इतकंच नाही तर कधीही न पटलेल्या मुद्द्यावर उत्कर्ष नेहमीच सडेतोड भाष्य करताना दिसतो. अशातच आता उत्कर्षने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
यामध्ये काश्मीरमध्ये एक दुकानदार त्याच्याशी मराठी भाषेत संवाद साधताना दिसत आहे.
उत्कर्षने त्याचा जम्मू काश्मीरमधील एका दुकानदाराबरोबरच्या मराठीतील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्याने असं म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात मराठी बोलायला काहींना शिकायचंच नाही म्हणे. कोणतीही भाषा माणसे जोडण्यासाठी उदयास येते. पण, काहींना त्यांचा धंदा महाराष्ट्रात करायचा आहे, पैसे इथून कमवायचे आहेत, रोज ट्रेन भरुन लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात घेऊन यायचे; पण भाषा मराठी शिकायची नाही का?”, असं म्हटलं आहे.
त्यानंतर त्याने एक उत्तम अनुभव शेअर करत म्हटलं, “आज काश्मीर श्रीनगरमध्ये वाणी ड्रायफ्रूट्सच्या दुकानात गेलो असता. मुंबई? तुम्ही महाराष्ट्रामधून आले का? बसा बसा म्हणत मराठीत त्या दुकानदाराने संवाद सुरु केला. तोडकं- मोडकं मराठी बोलत त्याने आमचे मराठी मन जिंकले. त्या काश्मिरी मुस्लीम बांधवांना कळलं हे भाषेचं महत्त्व. त्याच्या मराठी बोलण्यामुळे दोनच्या जागी १० गोष्टी घेतल्या आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणत ‘खुदा हाफिज फिर आयेंगे भाई’ म्हणत त्याच्याही भाषेला मान देत तिथून निघालो”.
शेवटी उत्कर्ष असं बोलताना दिसत आहे की, “मराठी भाषा आपली नाही; समजून काही माणसं दूर जात आहेत, त्यांना मला हेच सांगायचं आहे. तुम्ही आमच्या मराठीला मान-सन्मान द्या. आम्ही तुमच्या भाषेला मनात स्थान दिलेच आहे. हिंदी-मराठी भाई भाई, मग कशाला करायची उगाच लढाई?”. हा व्हिडीओ शेअर करत ‘काश्मीरमध्ये मराठीचा बोलबाला’ असं कॅप्शन देत उत्कर्षने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये काश्मिरी दुकानदार उत्कर्षबरोबर “पटकन खाऊन बघा… एकदम चांगलं चांगलं…” असे काही मराठी संवाद बोलताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून त्या काश्मिरी दुकानदारावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.





