Dinkar Shinde Passed Away : भीम गीतं, लोकगीतं तसंच अनेक मराठी गाण्यांसाठी संगीत क्षेत्रातील एक महत्त्वाचे व लोकप्रिय नाव म्हणजे शिंदे घराणं, आजवर आपल्या गायकीने व आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. आपल्या गायकीने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या या शिंदे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिंदे घराण्यातील प्रतिष्ठित व्यक्तीचं निधन झालं आहे. गायक आनंद शिंदे यांचे धाकटे भाऊ म्हणजेच दीनकर प्रल्हाद शिंदे यांचं निधन झालं आहे. आनंद शिंदे यांनी त्यांच्या लोकगीताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आदर्श आणि उत्कर्ष यांनीही त्यांचा शिंदेशाही बाणा जपला. आदर्श आणि उत्कर्ष दोघेही उत्तम गायक आहेत. उत्कर्ष या गायनाशिवाय सोशल मीडियावरही सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रसंगे व आठवणी शेअर करत असतो. (Dinkar Shinde Passed Away)
अशातच उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या काकांच्या निधनाची दुःखद बातमी शेअर केली. बुधवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. उत्कर्षने इन्स्टाग्रामवर त्यांच्याविषयी भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “महागायक प्रल्हाद शिंदेचे लहान चिरंजीव, आनंद मिलिंद शिंदेंचे धाकटे भाऊ आणि विजया आनंद शिंदेचे नात्याने जरी दीर तरीही मनात स्थान मात्र पहिल्या मुलाचे. हर्षद उत्कर्ष आदर्शचे दिनू नाना. काका कमी पण दोस्त जास्त. नेहमी हसरा चेहरा, फुल ऑन एनर्जी, मस्त कलंदराच आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “गावातून कल्याणचा प्रवास कसा झाला. गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट जबाबदारीची जाण ठेवत अवेळी मोठी झाली. कसा शिंदे घराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला. भावाभावांनी एकत्र कसं रहायचं ते तुमच्याकडून शिकलो. आज जेव्हा मी माझ्या पुतण्याना आल्हाद हर्षद शिंदे, अंतरा आदर्श शिंदे., आलाप हर्षद शिंदे ह्यांना खाद्यावर घेऊन मस्ती करतो तेव्हा आठवण येते तुम्हा सर्व काका लोकांची. कारण आम्हाला ही तुम्ही असेच खांद्यांवर घेऊन वाढवलत. तुम्ही ही शिकवण दिलीत पुतणे म्हणजे मित्र आपली मुलच. म्हणून आज आल्हाद मला नाना काका नाही तर मला भाई म्हणतो. शिंदेघराण्याने काय कमवल असेल तर ते असतील नाती माणसे मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग”.
आणखी वाचा – घरी जाण्यासाठी योगिताचा Bigg Boss कडे हट्ट, शोमधील त्रास अभिनेत्रीला सहन होईना, एक्झिट घेणार का?
यापुढे उत्कर्षने आपल्या काकांविषयी असं म्हटलं आहे की, “मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला. त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत. एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच. तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलीत. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुष्याला भिडण्याची कला शिकवून गेला. स्टेजवर तुम्ही एंट्री केली की, एक वेगळाच आत्माविश्वास आमच्या आठवणीत राहील. तुम्हा सर्वांच्या संस्कारामुळेच आज हर्षद, आदर्श, उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकद बनून सोबत राहू. आणि पुढेही असेच शिंदे घराण्याचा वटवृक्ष आणखी जास्त भव्य समृद्ध करू. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि लहानपणापासून ते आतापर्यंतचा तुमच्याबरोबर केलेला प्रवास हा डोळ्यांसमोर उभा राहिला. दिनू नाना तुम्ही कायम स्मरणात राहाल”.