Lata Mangeshkar Award : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्कार जाहीर करण्यात येतात. अशातच यंदाचे म्हणजेच २०२४ चे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर करण्यात आल्याने संगीत क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. अनुराध पौडवाल यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
या पुरस्काराबरोबरच आणखी बारा राज्यातील सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पण केलं आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा सन २०२४ चा भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार- २०२४ साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४ चा पुरस्कार श्रीमती शुभदा दादरकर यांना जाहीर झाला. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन २०२४ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.
नाटक विभागासाठी विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारात सुदेश भोसले यांना पुरस्कार जाहीर झाला. लोककला क्षेत्रातील पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना तर शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार शाहीर राजेंद्र कांबळे यांना जाहीर झाला आहे. नृत्य क्षेत्रातील पुरस्कार सोनिया परचुरेंना तर चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला.