‘यारियां’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता हिमांश कोहली विवाहबद्ध झाला आहे. एकेकाळी नेहा कक्करसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या या अभिनेत्याने १२ नोव्हेंबरला विनी कोहलीबरोबर लग्नगाठ बांधली. या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिमांश कोहलीने दिल्लीतील एका मंदिरात विनीशी लग्न केले. हा विवाह एका खाजगी समारंभात झाला आहे. या लग्नसोहळ्याला कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत (Himansh Kohli Marriage)
“सदैव एकत्र” असं म्हणत हिमांशने त्याचे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी हिमांश गुलाबी रंगाच्या शेरवानीत आणि त्याची पत्नी सोनेरी रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होते. हिमांशने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाची वरात आणि लग्नाचे काही फोटो चहात्यांबरोबर शेअर केले आहेत. हिमांशच्या नवविवाहित वधूबरोबरचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. हिमांशने शेअर केलेल्या या फोटोवर मनोरंजन सृष्टीतील कलाकार व त्याच्या अनेक चाहते मंडळींकडून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा – तुळशीच्या लग्नाला करा ‘हे’ तीन फायदेशीर उपाय, धनलाभासह मिळतील अनेक फायदे, शास्त्र काय सांगतं?
बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व हिमांश एकेकाळी रिलेशनशिप मध्ये होते. नेहा कक्कर आणि हिमांश कोहली एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. पण २०१८ मध्ये दोघेही वेगळे झाले. या ब्रेकअपनंतर दोघेही मोकळेपणाने बोलले. नेहादेखील कॅमेऱ्यासमोर अनेकदा व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले. हिमांश कोहली व नेहा कक्कर यांच्या लग्नाचीही चर्चा होती, मात्र या लग्नापर्यंत पोहचण्यासाठी त्यांचे ब्रेकअप झाले आणि २०२० मध्ये नेहाने रोहनप्रीतसह लग्न केले.
दरम्यान, हिमांशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर हिमांशने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. हिमांश ‘हमसे है लाइफ’मध्ये दिसला आहे. यानंतर तो ‘यारियां’, ‘जीना इस का नाम है’, ‘रांची डायरीज’, ‘दिल जो ना कह सका’मध्येही दिसला आहे. त्याचबरोबर तो अनेक म्युझिक व्हिडीओंमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.