सध्या सर्वत्र आंब्यांचा सिझन सुरु झाल्याने अनेक आंबाप्रेमी पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. काही आंब्यांचा व्यवसाय करताना तर काही यंदाच्या आंब्याची चव चाखताना दिसत आहेत. अशातच मराठी कलाक्षेत्रातील एका लाडकी जोडी जे आंब्याचा व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आहे. ही जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या सालाबादप्रमाणे सुरु असलेल्या लघाटे आंबेवाले या व्यसायाबाबत सोशल मीडियावरुन माहिती शेअर केली. सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश यांचा वावर बऱ्यापैकी मोठा असलेला पाहायला मिळाला. (Mugdha vaishampayan and Prathamesh Laghate)
प्रथमेशने काही दिवसांपूर्वी “नमस्कार! २०२४च्या आंब्याच्या सिझनमध्ये तुमचं स्वागत आहे. आंबाप्रेमींच्या सेवेत आत्तापासून पुन्हा रुजू होत आहोत. तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा. गुढीपाडव्यासाठी लघाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा”, असं म्हणत व्यवसायाबद्दलची माहिती दिली. यानंतर आता मुग्धाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन “गुढीपाडव्यानिमित्त आणखी काही आंबे रवाना होत आहेत”, असं कॅप्शन देत आंब्यांच्या पेट्यांचा फोटो पोस्ट केला आहे.
लघाटे आंबेवाले या व्यवसायात मुग्धाही प्रथमेशला हातभार लावताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच मुग्धा व प्रथमेश यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. दोघांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली चाहत्यांसह शेअर केली. लग्ननानंतर दोघेही त्यांच्या संसारात रमलेले दिसले. प्रथमेश हा कोकणातला असल्याने मुग्धाही कोकणात रमलेली दिसली. कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत ते नेहमीच कोकणदौरा करताना दिसतात.
प्रथमेशने ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत मराठी माणूस व्यवसायात उतरल्यामुळे त्याचं कौतुक केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रथमेशच्या या पोस्टवर नेटकऱ्याने ट्रोलही केलं आहे. मात्र या ट्रोलर्सला त्याने उत्तरही दिलं आहे. प्रथमेशच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट करणाऱ्या या नेटकऱ्याला त्याने चांगलंच सुनावलं आहे. तर अनेकांनी प्रथमेशकडून आंबेही ऑर्डर केल्याचं म्हटलं आहे.