सात मैत्रिणींच्या मनाचे भावविश्व उलगडून सांगणारा ‘झिम्मा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. लॉकडाऊननंतर मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात घेऊन येण्याचे काम या चित्रपटाने केलं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘झिम्मा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिससह प्रेक्षकांची व समीक्षकांचीदेखील चांगलीच पसंती मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीदेखील घोषणा करण्यात आली. (Hemant Dhome On Instagram)
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘झिम्मा २’ प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच सगळ्या चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले पाहायला मिळाले. ‘सॅम बहादूर’, ‘अॅनिमल’, ‘डंकी’, ‘सालार’ अशा बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांच्या शर्यतीत ‘झिम्मा २’ने आपले स्थान टिकवून ठेवले. पण आता या चित्रपटाने चित्रपटगृहांतून निरोप घेतला आहे. ‘झिम्मा २’च्या टीमने सोशल मीडियावर यासंबंधित एक खास पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
आणखी वाचा – बायकोसाठी बनला शेफ, गौतमी देशपांडेचे लाड पुरवतोय स्वानंद तेंडुलकर, खास पदार्थ अन्…
सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु आदी कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट व स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, “चित्रपटगृहात दोन महिने म्हणजेच ९ आठवडे, म्हणजेच एकूण ५६ दिवस या चित्रपटाने पूर्ण केले. परंतु, आज चित्रपटागृहातून रजा घेताना मन आनंदाने भरून येत आहे. पण समाधानाने व प्रचंड अभिमानाने भरलेला हा प्रवास आमच्या कायम लक्षात राहील. तुमचं (प्रेक्षकांचं) प्रेम, आपुलकी, हक्क व तुमचा विश्वास हीच ‘झिम्मा २’ची सर्वात मोठी कमाई व बक्षीस आहे. तुम्ही हा ‘झिम्मा’देखील आपला (प्रेक्षकांचा) केलात, त्याबद्दल धन्यवाद!”
आणखी वाचा – ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस १७’ चा अंतिम सोहळा, विजेत्याला मिळणार इतकी रोख रक्कम अन्…
दरम्यान, ‘झिम्मा २’ हा महिलाप्रधान चित्रपट असून यामध्ये सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्यामुळेच या चित्रपटाला महिला वर्गासह अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे या चित्रपटाने ५६ दिवसांत जवळपास १४ ते १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि आता हा चित्रपट चित्रपटगृहातून काढण्यात आला आहे.