fraud with celebrity : सोशल मीडियाच्या वाढत्या वापराचे जितके अधिक फायदे आहेत त्याहून अधिक तोटेसुद्धा आहेत. सध्या सोशल मीडियाचा गैरवापर अधिक प्रमाणात होत असल्याचं दिसत आहे. या डिजिटल युगात फ्रॉड, फेक कॉल्स, डिजिटल अरेस्टसारख्या धोकादायक गोष्टींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहे. फक्त सर्वसामान्य नागरिकच नाहीत तर अनेक मराठी सेलिब्रिटीही या फ्रॉड कॉल्सच्या विळख्यात अडकले आहेत. यापूर्वी चिन्मय मांडलेकरने व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली होती. चिन्मयच्या पत्नीला फ्रॉड कॉल आला होता आणि त्यानंतर चिन्मयने ही बाब शेअर केली होती. यानंतर ऐश्वर्या नारकर यांनीदेखील फ्रॉड कॉल आल्याचं म्हणत चाहत्यांना सावध केलं. यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्यासह अशी घटना घडली आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबरही फ्रॉड कॉलचा प्रसंग घडला आहे. सिद्धार्थने इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत या फ्रॉड कॉलची लाईव्ह झलक दाखविली आहे. इतकंच नाहीतर त्याने समोरच्या हिंदी भाषिक माणसाची फिरकीही घेतलेली पाहायला मिळत आहे. महानगर गॅस कंपनीच्या नावे आलेल्या या फ्रॉड कॉलमध्ये समोरची व्यक्ती सिद्धार्थला व्हाट्सऍपला एक मॅसेज करायला सांगत असते. मात्र, हा मॅसेज करण्यापूर्वी तो त्याला एक अट घालतो.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महानगर गॅस कंपनीच्या नावे आलेल्या कॉलमध्ये समोरची व्यक्ती सिद्धार्थशी हिंदी बोलताना दिसते. त्यावर सिद्धार्थ त्याला मराठीत बोलण्यास सांगतो. त्यानंतर समोरची व्यक्ती मराठी येत नसल्याचं म्हणते. त्यावर सिद्धार्थही ‘महानगर’चे कर्मचारी असून, मराठी येत नाही, असं म्हणत त्याची फिरकी घेतो. सिद्धार्थ त्याला म्हणतो, “तुम्ही मराठीत एक ओळ म्हटलीत, तर मी तुम्हाला मेसेज करेन.” त्यावर सिद्धार्थ त्याला ‘स्वर्गात आकाशगंगा…’ या गाण्याच्या ओळी म्हणायला सांगतो.
समोरील कॉलवरील व्यक्ती मराठीत बोलण्यास नकार देते; पण सिद्धार्थ त्याला या ओळी बोलल्याशिवाय मॅसेज करणार नाही, असं म्हणतो. तसंच तुम्ही हे गीत गायलंत, तर तुम्ही महानगर गॅस कंपनीमधून बोलताय हे नक्की होईल, हेही सांगतो. त्यामुळे ती व्यक्ती ‘स्वर्गात आकाशगंगा…’ गाण्याच्या ओळी म्हणण्यास तयार होते. पुढे सिद्धार्थच्या मागोमाग ती व्यक्ती त्याच्या तोडक्या मोडक्या मराठीत ‘स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या शंभर, झाला आनंद आली बहार…’ हे गीत म्हणते.
आणखी वाचा – “पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात…”, राकेश बापटला पूर्वाश्रमीच्या पत्नीचा सपोर्ट, म्हणाली, “तो जसा आहे…”
हिंदी भाषिकाच्या आवाजातील गाणं ऐकून सिद्धार्थला हसू अनावर होतं. त्यानंतर सिद्धार्थ कॉल कट करतो आणि हसू लागतो. दरम्यान, घडलेला संपूर्ण प्रकार सिद्धार्थनं त्याच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे आणि हा व्हिडीओ त्यानं शेअर केला आहे. “Mahanagar Gas Fraud Call. It was fun. सोनुरी काठे, झालाला.
कुठलीही सरकारी संस्था तुम्हाला whatsapp वर चॅट करायला सांगत नाही. खूप लोक याला बळी पडत आहेत. सर्वांनी काळजी घ्या. आणि त्यांची मजा घ्या”. पुढे कॅप्शन देत त्याने असं म्हटलं की, “महानगर गॅस किंवा इतर कोणतीही सरकारी संस्था तुम्हाला कधीही व्हॉट्सअॅपवर सक्तीने चॅट करण्यास सांगणार नाही. या फसव्या कॉलमुळे बरेच लोक खूप पैसे गमावत आहेत. काळजी घ्या”.





