Paaru latest Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या लोकप्रिय मालिकेत गेल्या काही दिवसांपासून एक रंजक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथेत सतत नवनवीन वळण आल्यामुळे मालिकेत पुढे नेमकं काय घडणार? यावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना दिसली. दरम्यान प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या या नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की,आदित्य एका महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या कामासाठी चेन्नईला रवाना होतो. परंतु याचदरम्यान चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनचा भीषण अपघात होतो आणि आदित्यही त्याच ट्रेनमध्ये असल्याचं स्पष्ट होतं.
दरम्यान, प्रीतम अहिल्यादेवीने दिलेला ताईत आदित्यला देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचतो. पण तो येईपर्यंत आदित्य ट्रेन पकडून निघून गेलेला असतो. यानंतर प्रीतमला ट्रेनच्या अपघाताची बातमी कळते. बातमी ऐकताच तो तातडीने पोलिसांशी संपर्क साधून आदित्यचा शोध घेण्यास सुरुवात करतो. मात्र अपघात इतका भीषण झालेला असतो की कोणत्याही प्रवाशाची ओळख पटवणं कठीण झाल्याचं पोलिस त्याला सांगतात.
एकीकडे ही बातमी पारूला समजताच तिची चिंता वाढलेली दिसते. तर दुसरीकडे अहिल्यादेवीही हादरून जाते आणि ताबडतोब एका व्यक्तीशी संपर्क साधून आदित्यचा शोध घेण्यास सांगते. मात्र ओळख पटवण्यासाठी आदित्यची काही वैयक्तिक माहिती लागेल, असं तो व्यक्ती सांगताच श्रीकांत अहिल्यादेवीला सुचवतो की “ती माहिती फक्त पारूच देऊ शकते.”
आणखी वाचा : घटस्फोटाच्या तीन महिन्यांतच मराठी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, केळवणाचा व्हिडीओ समोर
याचवेळी मालिकेत आणखी एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. घरात पारू एकटी असताना एक अनोळखी व्यक्त घरात येतो आणि तिला धमकावू लागतो. आधीच आदित्यच्या शोधामुळे तणावात असलेली पारू आता नव्या संकटात सापडते. आता मालिकेत पुढे काय होणार? प्रीतम आणि अहिल्यादेवी आदित्यला शोधू शकतील का? पारूवर आलेलं संकट तिला आणखी अडचणीत टाकणार का? या नव्या ट्विस्टने मालिकेचा येणारा भाग प्रेक्षकांसाठी अधिक रंजक ठरणार आहेत.





