सध्या सोशल मीडियावर सर्वत्र मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाची चर्चा सुरु आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला. यामुळे एक वेगळा वाददेखील निर्माण झाला आहे. या सगळ्या संतापलेल्या प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. प्राजक्ताने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच तिने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी असे निवेदनही केले. अशातच आता या सगळ्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. (sushma andhare on prajkata mali)
प्राजक्ताने राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, तसेच सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान याबद्दल आता सुषमा यांनी या प्रकरणी ‘एबीपी माझा’ शी संवाद साधताना प्राजक्ताने केलेल्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सुषमा म्हणाल्या की, “सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. प्राजक्ता माळीने घेतलेली पत्रकार परिषद मला पटली नाही. प्राजक्ताने पत्रकार परिषद का घ्यावी?, कोणाला सांगायचे आहे?, मित्र स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे विषय सोडून द्यायला हवा होता. पृथ्वीचा आकार केवढा? तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असं म्हणा आणि सोडून द्या”.
पुढे त्या म्हणाल्या की, “या सगळ्याचे तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावेसे वाटते.सुरेश यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यापेक्षा दीड महिन्याआधी जे करुणा मुंडे आक्षेपार्ह बोलल्या त्यावर आक्षेप का नाही घेतला? त्यावेळी प्राजक्ताने पत्रकार परिषद घेतली नाही. त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष का केलं? आतादेखील त्या दुर्लक्ष करु शकल्या असत्या. आता त्यांनी पत्रकार परिषद घेणं राजकीय हेतु असल्यासारखे वाटत आहे. सुषमा अंधारेंच्या विरोधात जेव्हा बोललं गेलं तेव्हा का नाही सुचलं? सुरेश धस यांच्याविषयी जी आगपाखड होत आहे ते कोणत्या पक्षाचे आहेत? सुरेश हे भाजपचे नेते आहेत. भाजपची संस्था आरएसएस आहे”.
पुढे त्या म्हणाल्या की, “प्राजक्ता माली आरएसएसच्या मुख्यालायात जातात तेव्हा त्या कलाकार राहत नाहीत. कारण त्यांचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टँड तयार होतो. त्यांचा एक वेगळा राजकीय दृष्टीकोण तयार होतो”. असं त्या म्हणाल्या. दरम्यान आता सुषमा अंधारे यांच्या व्यक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.