गेल्या अनेक दिवसांपासून शिवरायांचा छावा या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. पोस्टर, ट्रेलर पाहून अनेकजण या चित्रपटासाठी आतुर असल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच नुकताच या चित्रपटाचा आणखी एक नवीन टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या टीझरचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संभाजी महाराज यांना रयतेच्या रक्षणाची जबाबदारी देत असताना ते त्या जबाबदारीचे महत्त्व समजावताना दिसत आहेत. तर याचवेळी अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत सिंहासनावर विराजमान होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – चित्रपटगृहे गाजवल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी ‘सॅम बहादूर’ सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर व भूषण पाटील यांनी या चित्रपटाचा दुसरा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये, “जयांच्या ध्वनीने उसळती सह्याद्री आणि समुद्र रायगडी बैसले सिंहासनी गर्जती रुद्र.” असं म्हणत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेते अमोल कोल्हेच शोभून दिसतात किंवा या चित्रपटासाठी विशाल निकमची निवड करायला हवी होती अशा आशयाच्या कमेंट्स आल्या आहेत.

दरम्यान, ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनीचे वैभव भोर, किशोर पाटकर व मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्माते भावेश रजनीकांत पंचमतीया हे आहेत. संभाजी महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद व गाणीदेखील त्यांचीच आहेत. तसेच या गाण्यांना साजेसं संगीत संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे आणि पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.