कलाक्षेत्रात काम करत असताना कलाकार बऱ्याचदा मित्र-परिवाराचं कौतुक करताना दिसतात. एखादा प्रोजेक्ट एकत्र केल्यानंतर सहकलाकारांबरोबर मैत्री जमते. काहीवेळा मात्र कलाकारांमध्ये झालेले वाद कानी येतात. इंडस्ट्रीत कोणीच कोणाचं नाही असं तर काही कलाकार स्पष्टपणे बोलताना दिसतात. प्रत्येकाच्या अनुभवांवर मैत्रीचं हे संपूर्ण गणित अवलंबून असतं. सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षेंचंही इंडस्ट्रीतील मैत्रीबाबत काही वेगळं मत आहे. इंडस्ट्रीतील मैत्रीवर त्यांचा फारसा विश्वास नसल्याचं त्यांनी सांगितलं. शरद यांना जेव्हा कॅन्सरने घेरलं तेव्हा त्यांना याची संपूर्ण जाणीव झाली. याबाबतच त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Sharad ponkshe talk about Marathi industry)
शरद पोंक्षे, सुनिल बर्वे, संजय मोने, भरत जाधव यांचा ‘बंजारा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरद यांचा मुलगा स्नेहने केलं आहे. ‘बंजारा’च्या निमित्ताने शरद यांनी ITSMAJJA ला मुलाखत दिली. यावेळी ते इंडस्ट्रीतील मैत्रीबाबत बोलत होते. शरद म्हणाले, “इंडस्ट्रीमध्ये मित्र होणं खूप अवघड गोष्ट आहे. इथे समोरासमोर सगळं खोटं बोलणारे लोक आहेत”.
“आमच्या जशा भूमिका खोट्या असतात उदाहरण म्हणजे आई, भाऊ भूमिकेमधला खोटा असतो तसंच इथे असणारे लोक खोटे आहेत. त्यामुळे खोट्या वागणाऱ्या या विश्वामध्ये खरे मित्र मिळणं खूप अवघड आहे. खूप चांगला माणूस असणं गरजेचं आहे. जी चांगली चांगली माणसं असता ती आपोआप एकमेकांना कनेक्ट होतात. आम्ही सगळी चांगली माणसं एकमेकांना कनेक्ट झालो आहोत. मला मित्रांची संख्या वाढवण्याची इच्छाही नाही”.
आणखी वाचा – वोडकाची नदी वाहते, रशियन दारू पिऊन पडतात, उलट्या अन्…; सलमान खानच्या पार्टीचं धक्कादायक सत्य समोर
पुढे ते म्हणाले, “जे काय माझे चार-पाच मित्र आहेत तेवढे मला बस्स झाले. हे मी खरंच सांगतो. मी या आजारपणातून गेल्यानंतर तर मला याची पूर्ण जाणीव झाली. कोण आपलं कोण परकं हे मला खूप जाणवलं. समोर दाखवणारे खूप असतात. समोर येऊन पाया वगैरे पडणारे मी आयुष्यात खूप बघितले. तर असलं काही आपल्याला नको आहे. त्यामुळे ही सगळी (संजय मोने, भरत जाधव, सुनिल बर्वे) ही सगळी चांगली माणसं आहे. माझे चांगले मित्र आहेत. ही खूप प्रेमाने काम करणारी माणसं आहेत. यांचं सगळ्यात पहिलं प्रेम माझ्यावर नाही. सगळ्यांचं प्रेम हे कलेवर आहे”. शरद यांनी बेधडकपणे त्यांचं मत मांडलं.