बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यापैकी एक म्हणजे अभिनेता शम्मी कपूर. १९५० ते १९७० हा २० वर्षांचा मोठा असा काळ या अभिनेत्याने विशेष गाजवला. या अभिनेत्याने त्याच्या अनोख्या अशा अभिनयशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली. चित्रपटातून शम्मी जेव्हा जेव्हा पडद्यावर यायचा तेव्हा तेव्हा त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. शम्मी कपूर त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिला. अभिनेत्याच्या अफेअर्सची यादी मोठी आहे आणि खूप चर्चेत राहिलेली आहे. शम्मी कपूरचे नाव सिनेसृष्टीतील चार अभिनेत्रींशी जोडले गेले. (Shammi Kapoor Love Life)
नूतन व शम्मी कपूर शेजारी होते. लहानपणापासून ते एकत्र वाढले. असे म्हटले जाते की, शम्मी लहानपणापासूनच नूतनवर प्रेम करत होते. दोघांच्या कुटुंबात चांगले संबंध होते. मोठे झाल्यावर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. मात्र नूतनची आई पतीपासून विभक्त झाली होती. नूतनच्या आईने शम्मीला नकार दिला होता आणि तिने नूतनला शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला पाठवले. यानंतर शम्मी व नूतनची प्रेमकहाणी संपुष्टात आली. त्यांनतर नूतन व शम्मी यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि ते कायमचे मित्र राहिले.
१९५३ मध्ये शम्मी कपूर क्रिकेट सामन्यासाठी श्रीलंकेला गेले होते. एके दिवशी तो कॅबरे परफॉर्मन्स पाहण्यासाठी हॉटेलमध्ये गेला, तिथे त्याची नादियाशी भेट झाली. नादिया कॅबरे कलाकार होती. शम्मीने नादियाच्या प्रेमात पडून तिला प्रपोज केले होते. मात्र, नादिया म्हणाली होती की, ती लग्नासाठी तयार आहे, पण शम्मीला ५ वर्षे वाट पाहावी लागेल. तोपर्यंत प्रेम राहिले तर लग्न करू, असंही ती म्हणाली. यानंतर काही काळ त्यांचे अफेअर होते, पण नंतर ते वेगळे झाले. यानंतर शम्मी कपूरने गीता बालीबरोबर लग्न केले. या लग्नापासून त्यांना कांचन व आदित्य राज कपूर ही दोन मुले झाली. १९६५ मध्ये गीताने अखेरचा श्वास घेतला.
गीताच्या मृत्यूनंतर शम्मीची बीना रमाणी यांच्याशी भेट झाली. यादरम्यान शम्मीचे नाव बीनाबरोबर जोडले गेले. मात्र, या नात्याला काही नाव मिळाले नाही आणि दोघेही वेगळे झाले. शम्मी कपूर यांनी १९६८ मध्ये मुमताजबरोबर काम केले होते. यामुळे दोघे जवळ आले. शम्मीने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. मुमताजनेही हो म्हटलं होतं. पण मुमताज कपूर घराण्याच्या परंपरेच्या विरोधात होती की तिला लग्नानंतर चित्रपटात काम करता येणार नाही. याच कारणामुळे दोघे वेगळे झाले. यानंतर १९६९ मध्ये शम्मीने नीला देवीशी लग्न केले. शम्मी कपूर यांनी २०११मध्ये या जगाचा निरोप घेतल्याची माहिती आहे.
शम्मी कपूर हे राज कपूर आणि शशी कपूर यांचे भाऊ होते. त्यांचे वडील दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर होते. शम्मी कपूर यांनी १९५३मध्ये ‘जीवन ज्योती’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण १९५७मध्ये आलेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटाने शम्मी कपूरला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी ‘दिल देके देखो’, ‘सिंगापूर’, ‘जंगली’, ‘कॉलेज गर्ल’, ‘प्रोफेसर’, ‘चायना टाउन’सारखे सुपरहिट चित्रपट दिले.