ज्या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे, ती ‘सत्यप्रेम की कथा’ काल सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री कियारा अडवाणी ‘भुलभुलैय्या २’ नंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतायत. बरं या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची जितकी चर्चा रंगली होती, तितकीच चर्चा चित्रपटातील ‘पसूरी’ गाण्याच्या रिमेकचीदेखील रंगलेली. कारण चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘पसूरी’ या मूळ गाण्याचा रिमेक जेव्हा समोर आला, तेव्हा त्या गाण्याचे चाहते व नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे हा चित्रपट वादात अडकला. एवढं सगळं होऊनही अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाला.
आता चित्रपटाचा ट्रेलर तर तुम्ही पहिला, पण तुम्हाला माहितीये की ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक मराठी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव असून त्यांनी अनेक मराठी चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केलेलं असून मराठीतील अनेक स्टार कलाकारांसोबत काम केलेलं आहे. ते नाव म्हणजे, समीर विध्वंस.
समीर विध्वंस यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘आनंदी गोपाळ’, ‘टाईमप्लीज’, ‘लग्न पाहावे करून’, ‘क्लासमेट्स’, ‘डबल सीट’, ‘धुरळा’, ‘YZ’, ‘समांतर’ अश्या अनेक चित्रपट व वेबसिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन समीर यांनी केलं. त्याचबरोबर ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ या चित्रपटातही समीरनं अभिनय केलं आहे. समीर ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. समीर यांच्या पत्नी इरावती कर्णिक यादेखील लेखिका असून त्यांनी ‘झिम्मा’ या सुपरहिट सिनेमाचे लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाचे लेखनही इरावती यांनी केलंय.
ह्या चित्रपटाच्या निमित्ताने समीरचे बॉलीवूड डेब्यूट होणार असल्याचे कळताच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी समीरच्या नव्या प्रोजेक्टचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या.