‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही झी मराठी वाहिनीवरील उत्कंठावर्धक मालिका आहे. मालिकेत येणारे एकामागून एक नवीन ट्विस्ट या मालिकेची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत. गेले काही दिवस रुपालीला मिळालेल्या वशीकरणाच्या शक्तीमुळे ती राजाध्यक्ष कुटुंबातील नेत्रा, इंद्राणी व अद्वैत यांना सतत त्रास देत होती. त्यांना वश करुन ती सांगेल त्याप्रमाणे करायला सांगत होती. रुपालीने आपल्या वश करण्याच्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले होते.
मात्र आता केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस हे आता रुपालीच्या वशमधून बाहेर आले आहेत. ग्रहण संपल्यामुळे रुपालीची वशीकरणाची शक्ती संपली. तसेच देवीआई मूर्च्छित पडली होती, ती आता त्यातून बाहेर आली आहे. त्यामुळे आता देवीआईच्या लेकी म्हणजेच नेत्रा व इंद्राणी आता रुपालीविरुद्ध लढू शकणार आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या भागात रुपाली इंद्राणीचा छळ करत असताना नेत्रा तिथे येते आणि रुपालीला खाली पाडते. रुपाली खाली पडताच नेत्रा तिच्या हातावर पाय ठेवते.
अशातच आता पुढील भागात नेत्राला काही संकेत मिळतात आणि या संकेतामध्ये तिला देवीआईचे मंदीर दिसते, मात्र तिला फक्त मंदीरच दिसते. यात तिला इतर काही दिसत नाही. तसेच रुपालीलाही वश करण्याच्या शक्तीच्यावेळी एक विशिष्ट धून ऐकू येते. त्यामुळे आता तिला पुन्हा कोणती शक्ती मिळणार की काय? याकडे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता देवीआई व विरोचक यांच्यातील युद्ध पाहायला मिळणार का? की मालिकेत आणखी पुढे काय होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तसेच चौथ्या पेटीचा अर्थ समजून घेण्यासाठी रुपालीने इंद्राणीला एक श्लोक सांगितला होता. रुपालीच्या ताब्यात असताना इंद्राणीने तो श्लोक पाठ केला होता. त्यामुळे आता देवीआईच्या लेकी व राजाध्यक्ष कुटुंबातील सगळेजण चौथ्या पेटीच्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊन पाचव्या पेटीचा शोध घेणार आहेत. त्यामुळे आता रुपालीच्या वशीकरणाच्या शक्तीतून बाहेर आल्यानंतर राजाध्यक्ष कुटुंबियांना पाचव्या पेटीचा शोध लागणार का? यात नेमकं काय दडलेलं असणार हे आता आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.