छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तितिक्षा तावडे. २६ फेब्रुवारी रोजी तितीक्षा लग्नबंधनात अडकली. तिने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्याशी लग्नगाठ बांधली. पनवेल येथे अत्यंत थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला. या विवाहाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या घरातल्यांबरोबरच मित्रपरिवार लग्नाला हजर राहिला होता. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तितीक्षाचं बालपण डोंबिवलीत गेलं असलं, तरीही अभिनेत्रीचं मूळ गाव कोकणात आहे. त्यामुळे यंदा गणपतीच्या सणाचं औचित्य साधत अभिनेत्री नवऱ्यासह कोकणात पोहोचली. (Titeeksha Tawde Kokan Village Home)
भिनेत्री तितीक्षा तावडे ही कोकणातली आहे आणि कोकणात नवीन लग्न झालेली जोडप्यांचा लग्नानंतर ओवसा करण्याची पद्धत असते. याच ओवसासाठी ती नवरा सिद्धार्थबरोबर कोकणात गेली होती. या कोकण प्रवासाची झलक तिने या युट्यूब व्हिडीओमधून दाखवली आहे. यात अभिनेत्रीने कोकण रेल्वेने प्रवास केला असून या प्रवासात त्यांना त्याबद्दल पाच तास उशीर झाला. या वेळेत दोघांनी रेल्वे स्टेशनवर केलेल्या मजामस्तीचीची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मुंबई ते कोकण प्रवास, कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव, ओवसा पूजन, देवदर्शन आणि कुटुंबियांबरोबरची मजामस्ती याचे खास क्षण तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
याचबरोबर तितीक्षाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या घराची झलकही पाहायला मिळत आहे. कोकणात कणकवलीमध्ये असरोंडी हे तितीक्षाचं गाव आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीची टुमदार घरं असतात तसंच तितीक्षाचेही घर आहे. टुमदार घर, घराला मोठं अंगण आणि अंगणात मोठी तुळस असं तितीक्षाचे घर आहे. याशिवाय तिच्या घराला लाकडाचे पारंपरिक पद्धतीचे बाधकाम असल्याचेही पाहायला मिळत आहे. घरात छोटेसे देवघर आणि स्वयंपाकघरही पाहायला मिळत आहे. याशिवाय घराच्या आजूबाजूला भातशेती आणि विहीर असल्याचेही तितीक्षाने तिच्या या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे एकूणच तितीक्षाने या युट्यूब व्हिडीओमधून तिच्या या घराची संपूर्ण झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. याआधी तिने या घराचे व्हिडीओ काढले होते. मात्र तिने कधीच हे कुठे पोस्ट केले नाहीत. पण आता तितीक्षाने तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून स्वत:च्या घराची झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे. दरम्यान,तितीक्षाने पारंपरिक पद्धतीने ओवसा पूजन केले आणि या सर्व पूजेची झलकही तिने या व्हिडीओमध्ये दाखवली आहे