झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस रोमांचक व रहस्यमय होत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेबरोबरच मालिकेतील कलाकारांचं ही सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्ये प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेच्या शूटिंगचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. (Aishwarya Narkar On Instagram)
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधून एका सीनसाठी कलाकारांसह इतर तंत्रज्ञ मंडळी किती मेहनत घेतात हे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांच्या एका सीनचे शूट होत आहे. ज्यात एका बंद खोलीमध्ये त्यांच्या आजूबाजूला काही माणसे मेलेली दाखवण्यात आली आहेत आणि त्या माणसांमध्ये ऐश्वर्याही सुन्नावस्थेत पडलेल्या दिसत आहेत. तसेच व्हिडीओमध्ये पुढे एका मॉनिटरच्या स्क्रीनमध्ये अद्वैत व रुपाली एकत्र दिसत आहेत आणि या सीनमध्ये रुपाली अर्थात ऐश्वर्या खूपच घाबरलेल्या दिसत आहेत.
मालिकेतील कलाकार व इतर तंत्रज्ञ मंडळी पडद्यावर उत्तम चित्र रेखाटलं जावं म्हणून अहोरात्र मेहनत घेत असतात आणि तीच मेहनत या व्हिडीओमधून दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक कॅमेरामॅन उंचावर कॅमेरा धरुन हा सीन शूट करत आहे. तसेच सीनसाठी पंख्याच्या सहाय्याने धूर केला जात असल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
ऐश्वर्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या अनेक फोटो-व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्याचबरोबर मालिकेचे पडद्यामागील काही खास क्षण व्हिडीओद्वारे शेअर करत त्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहतात. दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच आगामी भागात हा सीन कधी पाहायला मिळणार? यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत.