Kareena Kapoor On Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री चाकूने हल्ला करण्यात आला. या बातमीने सिनेविश्वात खळबळ माजली आहे. हल्ल्यानंतर अभिनेत्याला उपचारासाठी त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने सहा वार केले असल्याचं समोर आलं. अभिनेता गंभीर जखमी झाला असल्याचं समोर आलं आहे. इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून तब्बल अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. या संपूर्ण घटनेनंतर या प्रकरणावर अभिनेत्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
करीना कपूरच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात अभिनेत्रीने काल रात्रीची घटना सांगितली आहे आणि सैफच्या तब्येतीचीही माहिती दिली आहे. अभिनेत्री म्हणाली की, “काल रात्री घरात चोरीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून तो रुग्णालयात आहे. आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. कुटुंबातील उर्वरित सदस्य सुखरुप आहेत”. पुढे निवेदनात करिनाने चाहत्यांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणाली, “आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी संयम राखावा आणि आणखी कोणत्याही अफवा पसरवू नका कारण पोलिस आधीच योग्य तपास करत आहेत. असलेल्या काळजीबद्दल सर्वांचे आभार”.
सैफच्या घरातील मोलकरणीवर आधी घरात घुसलेल्या व्यक्तीने हल्ला केल्याचे बोलले जात आहे. चोरीच्या उद्देशाने तो घरात घुसला होता आणि नंतर त्याची मोलकरणीबरोबर बाचाबाची झाली. आवाज ऐकून सैफ अली खान आपल्या खोलीतून बाहेर आला तेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ अली खानवर उपचार करत असलेले डॉक्टर उत्तमानी यांनी सांगितले की, ‘अभिनेत्याच्या शरीरावर 6 जखमा आहेत. यातील दोन प्रहार खोल आहेत. ज्या चाकूने त्याच्यावर हल्ला केला त्याचा काही भाग अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यामध्ये गेला होता. मात्र, शस्त्रक्रियेद्वारे तो काढण्यात आला आहे’.
सैफ अली खानने निवेदनात म्हटले आहे की, तो रात्री घरी असताना अचानक कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. करीना कपूर आणि मुले घरात असल्याने ते घाबरले होते. त्या हल्लेखोराने तीन वेळा हल्ला केला. दुखापतीमुळे त्याच्याकडून विजय मिळवता आला नाही. तर इतर नोकर झोपले होते. सर्व लोक आपापल्या घरी होते. नंतर ती व्यक्ती पळून गेली. रात्र झाल्यामुळे त्याला मारेकऱ्यांचा चेहराही स्पष्ट दिसत नव्हता.