मराठी सिनेसृष्टीतील असे बरेचसे कलाकार आहेत जे नेटकऱ्यांकडून सतत ट्रोल होत असतात. मात्र ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला न घाबरता प्रेक्षकांना सडेतोड उत्तर देताना दिसतात. यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून सई ही तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले.
अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण यादरम्यान अभिनेत्रीला तिच्या शारीरिक बदलांवरुन काही लोकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर सईने आता सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “महिलांना गरोदरपणानंतर स्वतःची व बाळाची काळजी घेण्यासाठी साधारणपणे ६ महिन्यांची प्रसूती रजा मिळते. पण मी ३ महिन्यांतच माझ्या कामाला सुरुवात केली. एक इन्फ्युएन्सर म्हणून मी काही उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी व या उत्पादनांच्या जाहिरातींचे शूटिंग करत आहे”.
यापुढे गरोदरपणानंतरच्या शाररीक रचनेवरुन होणाऱ्या टिकेबद्दल असं म्हटलं आहे की, “एखाद्या नव्याने आई झालेल्या स्त्रियांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याऐवजी लोक कशावर टीका करतात तर तिच्या वाढलेल्या शरीराबद्दल? आणि ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. एकमेकांबरोबर पुढे जाण्याऐवजी आपण इतरांना खाली खेचत आहोत”. तसेच यापुढे तिने “लोकांना जाड आणि बारीक यापलीकडे काही दिसतंच नाही का?, आपण नक्की कोणत्या समाजात राहत आहोत?”. असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला बायकोचा वाढदिवस, रोमँटिक फोटो समोर, म्हणाला, “सोनू…”
दरम्यान, सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.