‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना त्यांच्या कलेच्या जोरावर स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे रसिकाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आणि या कार्यक्रमामुळे ती घराघरांत पोहोचली. आपल्या अभिनयाने व कॉमेडीच्या उत्तम टायमिंगने रसिकाने प्रेक्षकांची मनं जिंकली. याशिवाय ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फ्रेशर्स’ या मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण काम केलं. (Rasika Vengurlekar Wedding Anniversary)
रसिकाने १० वर्ष डेट केल्यानंतर २०१८मध्ये अनिरुद्ध शिंदेसह लग्नगाठ बांधली. रसिकाचा नवराही अभिनयक्षेत्रात कार्यरत असून दिग्दर्शक आहे. दोघांच्या प्रेमाची सुरुवात ही त्यांच्या कॉलेजपासून झाली. त्यानंतर तब्बल दहा वर्ष ही जोडी रिलेशनशिपमध्ये होती. रसिकाच्या नवऱ्याने ‘फ्रेशर्स’, ‘का रे दुरावा’ यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्त रसिकाच्या नवऱ्याने त्यांचा एकत्र एक फोटो शेअर करत बायकोला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहे.
रसिकाच्या नवऱ्याने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “माऊ, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारात तू कायम माझ्याबरोबर असतेस. अशीच माझ्याबरोबर आयुष्यभर राहा. माझ्याकडून घडलेल्या चुका तू नेहमी समजून घेतेस आणि मला योग्य तो मार्ग दाखवतेस. माणूस कधीच एकटा यशस्वी होत नाही. त्याच्याबरोबर असणारी माणसं, पाठीशी असलेली त्याची साथ यामुळे त्याला बळ मिळतं आणि मी यशस्वी होण्यामध्ये मोलाचा वाटा तुझा आहे. तुलाही आयुष्यात मोठं होताना बघुन खूप आनंद होत आहे”.
यापुढे त्याने लिहिलं आहे की, “तुझं खूप कौतुक वाटतं. तुझ्या यशाच्या वाटचालीत मी नेहमी तुझ्याबरोबर कायम आहे. अशीच मेहनत दोघांनी मिळून करु कारण आपला प्रवास खूप दूरचा आहे. आणि या प्रवासात तुझा हा सहप्रवासी नेहमी तुझ्याबरोबर आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माऊ” असं म्हटलं आहे. यावर रसिकाने कमेंट करत, “आय लव्ह यु माऊ” असं म्हटलं आहे. तर अनेक कलाकारांसह, काही चाहत्यांनीही या पोस्टवर कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.