‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आयेशा म्हणजेच विदिशा म्हसकर. आयेशा या नकारात्मक भूमिकेमुळे विदिशाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही विदिशा बऱ्यापैकी सक्रिय असते. विशेषतः परदेश दौरे करत तेथील राहणीमान अनुभवत ती चाहत्यांसह शेअरदेखील करते. तसेच कायम सडेतोड भाष्य करण्यातही विदिशा अग्रेसर असलेली पाहायला मिळाली. निर्मात्यांनी पैसे थकवल्यानंतर विदिशाने आवाज उठवला होता. आता विदिशाने पुन्हा एकदा फसवणुकीवरुन भाष्य केलं. मात्र काही वेळातच तिने ही पोस्ट डिलीट केलेली पाहायला मिळाली. (Vidisha Mhaskar Angry Post)
या पोस्टमध्ये विदिशाने असं म्हटलं की, “नमस्कार मी विदिशा म्हसकर. कलाकार म्हणून आम्ही पैसे घेऊन सार्वजनिक कार्यक्रम करतो. सुजित सरकाले या माणसाने दोन महिन्यांपासून माझं मानधन थकवलं आहे. माझा विश्वास मिळवण्यासाठी आधीच्या दोन कार्यक्रमाचे पैसे त्याने वेळेत दिले होते. पण २३ मार्च २०२४ रोजी आम्ही एक कार्यक्रम केला त्याचं मानधन अजून दिलेलं नाही. मॅडम काय आपल्याच आहेत, असं म्हणून त्याने फसवणूक केली आहे. नंतर मला कळलं की, याने अनेकांची फसवणूक केली आहे”.
“दोन महिने याने अनेक खोटी कारणं दिली. खोटे चेकचे फोटो पाठवले, खोटे गुगल पेचे फोटो पाठवले. तरी माझ्या इतर कलाकार मित्रांनी आणि कार्यक्रम आयोजकांना (Event Organisers) सावधान करणं माझं कर्तव्य वाटतं. याच्याकडून कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आला तरी मानधनाची खात्री घेतल्या शिवाय तो कार्यक्रम करु नका. सावधान राहा. धन्यवाद”. आयेशाने या पोस्टमध्ये चेक, गुगल पे आणि संबंधित व्यक्तीचा प्रोफाइल फोटो पोस्ट केला होता.

विदिशाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, “ही पोस्ट करण्यामागचं कारण एकच. फसवणूक. खरं सांगून पैसे दिले नसते तरी चाललं असतं, पण फसवणूक मी कधी कोणाची केली नाही आणि कोणी करत असेल तर मी त्याला सोडणार नाही आणि दुसऱ्यांची ही करु देणार नाही. @sujit_sarkale @celebrity_manager_rudr या माणसाकडे खोटे आधारकार्ड पण आहे. माझ्या कलाकार मित्रांनी आणि कार्यक्रम आयोजकांनी सावधान व्हावे हेच सांगेन. धन्यवाद”. सध्या विदिशाने शेअर करून डिलीट केलेल्या या पोस्टची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.