लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगतापनं मालिकांमधून आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिने तिच्या गोड हसण्याच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. इतकंच नाही तरतिने अभिनय सोडून मेकअप आर्टिस्टचं शिक्षणही घेतलं. गेल्या काही काळात ती अभिनय क्षेत्रापासून काही काळ लांब होती. त्यामुळे तिने ब्रेक घेतला की काय? अशा चर्चा रंगताना दिसल्या होत्या. अशातच वीणाने कलर्स मराठीवरील ‘रमा माधव’ या मालिकेत एंट्री घेतली आहे.
कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मालिकेत रमा राघवचा वनवास सुरु झाला असून त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचं एक नवं पात्र मालिकेत प्रवेश करत आहे. या मालिकेआधी वीणा ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी वीणा ‘बिग बॉस’च्या घरातील काही सदस्यांसह तिच्या काही चाहत्यांची आवडती तर काहींची नावडती होती. याबद्दल वीणाने ‘इट्स मज्जा’शी साधलेल्या संवादात भाष्य केले आहे.
यावेळी वीणाने असं म्हटलं की, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. अशा परिस्थितीत मी संघर्ष करत आज जिथपर्यंत पोहोचली आहे. ते फक्त देवामुळे व माझ्या प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे. त्यांनी ‘राधा प्रेम रंगी रंगली’मधील माझ्या राधा या भूमिकेला स्वीकारलं किंवा ‘बिग बॉस’मध्येही काही लोकांना मी आवडले. काहींना मी नाही आवडले. पण ८०% लोकांना मला स्वीकारलं. मी ज्या ज्या ठिकाणी चुकले तिथे त्यांनी मला सुधारलं. मी आता जे कुणी आहे ते प्रेक्षकांमुळे आहे. त्यामुळे आताही माझ्या नकारात्मक भूमिका असली तरी ते मला स्वीकारतील अशी आशा आहे.”
दरम्यान, ‘कलर्स मराठी’वरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून वीणाने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मुळे वीणा अधिक प्रसिद्ध झोतात आली. आता पुन्हा एकदा वीणा ‘कलर्स मराठी’च्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.